महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार सोमवारी थंडावणार आहे. यावेळी निवडणुकीच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा आणि त्यावर विरोधकांनी दिलेले प्रत्युत्तर हा विषय चांगलाच गाजाला. हा नारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. मात्र, वस्तुस्थिती पाहली तर जनतेत फूट पाडून तोडण्याचे आणि त्यांना मारण्याचे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगलीत केला आहे. काँग्रेसचे सांगली विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी सभा झाली. यावेळी खरगे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे विषारी साप आहेत. समाजात द्वेष पसरवण्याचे आणि विष पेरण्याचे काम ते करत आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या सापाला ठेचावेच लागेल. उत्तर प्रदेशमध्ये एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजा अर्भकांचा मृत्यू झाला. तिकडे जायला योगी यांना वेळ नाही. मात्र महाराष्ट्रात ते प्रचार करीत फिरत आहेत. मणिपूर जळत असताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा तेथे जात नाहीत. महाराष्ट्रात प्रचारासाठी मात्र, त्यांना पुरेसा वेळ आहे. विदेशात फिरायला पंतप्रधान जातात, पण देशात एक प्रांत जळतोय त्याची त्यांना काळजी नाही, असे टिकास्त्रही त्यांनी सोडले.
ही लढाई जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी आहे. भाजपने एका आमदाराला पन्नास खोके दिले असतील, तर भाजपकडे किती पैसा आहे, याची कल्पना येईल. त्यांच्याकडे पैसा आहे तर आमच्याकडे जनता आहे. आम्ही जनतेच्या जोरावर महाराष्ट्रातील सत्तेवरून भ्रष्टाचाऱ्यांना पायउतार करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.