Published on
:
19 Nov 2024, 7:29 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:29 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी संपताच पैशाचा खेळ सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड हजार रुपयांमध्ये मत विकत घेणाऱ्याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत मतांसाठी पैसे घेणाऱ्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई इंदिरानगर भागात सोमवारी (दि.१८) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. अशोक रामभाऊ बाकोडे (४२, रा. शंभूनगर) असे पैसे वाटणाऱ्याचे तर नदीम पठाण असे पैसे घेणार्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर भागात एकजण पैसे वाटप करून मतदान विकत घेत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांना एका नागरिकाने तीन दिवसांपूर्वी आमच्या भागात मतदानासाठी पैसे वाटप करून गेलेला परत आला आहे, असा मेसेज टाकून तो बसलेल्या ठिकाणचा व्हिडीओ पाठविला. व्हिडीओ मिळताच अवघ्या १० मिनिटांत कॉवत यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरमाळे सांगून कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच एफएसटी पथकालादेखील पाचारण करण्यात आले. दोघांनी मिळून वाकोडे याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी भरारी पथकाचे सागर गोरे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मतदान झाल्यानंतर ५०० रुपये
वाकोडे हा मतदारांना दीड हजाराचे आमिष दाखवून मतदान विकत घेत होता. यासाठी तो त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड स्वतःकडे घ्यायचा. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो ५०० रुपये आणि घेतलेले दोन्ही कार्ड परत देणार असे सांगायचा. मागच्या तीन चार दिवसांपासून तो इंदिरानगर भागात फिरून मतदान विकत घेत होता असे समोर आले आहे.
पैसे कुणाचे?
प्रचाराचा कालावधी संपताच आता मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखविण्याचे काम उमेदवारांकडून सुरू झाले आहे, या घटनेने हे पुन्हा एकदा उघड झाले. इंदिरानगरात मतदारांना गेल्या तीन दिवसांपासून अशा पद्धतीने पैसे वाटप करण्यात येत होते. हे पैसे कोणता उमेदवार वाटप करीत होता, याचा पोलिस तपास करीत आहेत.
जावेद भाईकडून मिळायचे २०० रुपये
वाकोडे हा मतदार संघातील मतदारांकडे जाऊन त्यांचे दीड हजारात मतदान विकत घेत होता. याबदल्यात त्याला जावेदभाई नावाच्या व्यक्तीकडून २०० रुपये मिळत होते अशी त्यांनी पोलिसांकडे कबुली दिली आहे. त्यामुळे हा जावेदभाई कोण आहे याचा पोलिस तपास करत आहेत.