Published on
:
19 Nov 2024, 11:49 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:49 pm
बेळगाव : मद्यपी वाहनचालकांमुळे रस्ते अपघातात बळी जाणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांत पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणार्या शहर-उपनगर आणि तालुक्यात मात्र केवळ 920 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
बेळगाव शहर आणि जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांश अपघात मद्यपी वाहन चालकांमुळे घडल्याचे दिसते. मद्यप्राशन करून वाहन चालविणार्या वाहन चालकांना यापूर्वी जुजबी दंड ठोठावून सोडून दिले जात होते. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार दहा हजार रुपये दंड भरावा लागतो. मद्य प्राशन करून वाहन चालविताना सापडल्यास संबंधितांची ब्रेथ अॅनायलायझर मशिनच्या माध्यमातून चाचणी केली जाते. त्यामध्ये आलेल्या मद्याच्या टक्केवारीनुसार वाहन चालकाने किती मद्यप्राशन केले आहे, ते कळते; मात्र अशा गुन्ह्यात दंड करण्याचा अधिकार रहदारी पोलिसांना देण्यात आलेला नाही. वाहन जप्त केले जाते आणि संबंधितांनी न्यायालयात जाऊन दहा हजार रुपयांचा दंड भरल्यानंतर ती पावती पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर दंडाची पावती पाहून वाहन मालकाच्या हवाली केले जाते.
पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणार्या दक्षिण आणि उत्तर या दोन्ही रहदारी पोलिस ठाण्यासह शहर-तालुक्यातील ठाण्यांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर 2024 पर्यंत केवळ 920 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. म्हणजेच रोज केवळ तीनच वाहनचालक मद्य प्राशन करून वाहन चालवतात, असा अर्थ होतो. तथापि, प्रत्यक्षात ही संख्या मोठी असण्याचा अंदाज आहे. रहदारी पोलिस वाहन चालकांची तपासणी करतात. रोज मोठ्या संख्येने मद्यपी चालक पोलिसांना सापडतात; पण, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी घेऊन वाहने सोडून दिली जातात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
डंपरने धडक दिल्याने किणयेच्या युवकाचा बेळगाव-जांबोटी मार्गावर चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. मद्यपान केलेल्या चालकाने डंपरने दुचाकीस्वार युवकाला उडवले होते. त्यानंतर चार दिवस पोलिसांनी वाहनांची कडक तपासणी चालवली. नंतर ती थांबली.