Published on
:
19 Nov 2024, 11:58 am
Updated on
:
19 Nov 2024, 11:58 am
नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि परिसरामध्ये हवा प्रदूषणाने गंभीरतेची पातळी ओलांडली आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी दिल्लीतील न्यायालयांच्या सुनावण्या ऑनलाईन घेण्याची विनंती सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी ऑनलाईन सर्व सुनावण्या घेण्यास नकार दिला. तर प्रदूषणाची पातळी पाहता त्यांनी वकिलांना दूरदृश्यप्रणालीद्वारे हजर राहण्याची परवानगी दिली आहे.
सरन्यायधीश संजीव खन्ना यांनी वकिलांना सांगितले की, ज्या प्रकरणांमध्ये दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणीची शक्यता आहे, त्यामध्ये घेतली जाईल. दिल्लीतील गंभीर प्रदूषणामुळे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांकडे सर्व प्रकरणांच्या सुनावण्या ऑनलाईन घेण्याची विनंती केली होती.
कपिल सिब्बल म्हणाले की, वायू प्रदूषण नियंत्रणाबाहेर जात आहे त्यामुळे ऑनलाइन काम करण्याची परवानगी द्यावी. तसेच शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीशांना सांगितले की, दररोज सुमारे १० हजार वकील त्यांच्या वाहनांतून प्रवास करतात. ऑनलाईन सुनावण्यांमुळे यामध्ये बराच फरक पडू शकतो.