जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी ५.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. File Photo
Published on
:
29 Nov 2024, 2:07 pm
Updated on
:
29 Nov 2024, 2:07 pm
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी ५.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ही आकडेवारी भारताच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची अधिकृत आहे. आरबीआयच्या ७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा तिमाही वाढ खूपच कमी झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत भारताचा विकास दर ८.१ टक्के होता.
एप्रिल-जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६.७ टक्के वाढली होती, ही वाढ देखील आरबीआयच्या ७.१ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी होती. आरबीआयने २०२४-२५ मध्ये भारताची जीडीपी वाढ ७.२ टक्के होईल, असा अंदाज ठेवला आहे. तर आयएमएफ आणि इतर संस्थानी तो ७.० टक्के ठेवला आहे. अनेक जागतिक संस्था आणि बहुपक्षीय संस्थांनी देखील भारतासाठी वाढीचा अंदाज सुधारित केला आहे.
भारताचे सकल मूल्यवर्धित जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५.६ टक्केच्या दराने वाढले आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ही वाढ ७.७ टक्के होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत ही वाढ ६.८ टक्के होती. अनपेक्षित मंदीमुळे केंद्रीय बँकेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
जीडीपी वाढीचा दर कमी झाला असला तरीही कृषी क्षेत्रात सुधारणा झाली आहे. कृषी क्षेत्रात मागील तिमाहीतील २ टक्क्यांच्या तुलनेत वार्षिक ३.५ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, उत्पादन क्षेत्राची वाढ २.२ टक्क्यांवर घसरली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात ७ टक्के वाढ झाली होती. उत्पादन क्षेत्रात एका वर्षापूर्वी 14.3 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली होती. म्हणजे मोठे नुकसान या क्षेत्राच्या वाढीत झाले आहे. खाण क्षेत्रातही वाढ झाली नाही. तर निर्यातीत २.८ टक्के वाढ दिसून आली. जी मागील वर्षी याच कालावधीतील ५ टक्के आणि मागील तिमाहीत ८.७ टक्के होती.
जीडीपी वाढीची टक्केवारी घसरण्याचे कारणे काय?
चलनवाढीमुळे जीडीपी वाढ घसरली आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ खाद्यान्न महागाई १०.८७ टक्क्यांपर्यंत वाढली, ज्यामुळे ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाली. खासगी क्षेत्राची कामगिरीही निराशजनक राहिली आहे. ज्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम झाला.