दोन्ही शिवसेना आतच एकत्र येऊ शकतात, पुढे ते जमणार नाही:पण त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न करणे गरजेचे- संजय शिरसाट

2 hours ago 1
आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधले अंतर वाढले नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील, असे विधान समाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजे. एका बाजूने प्रयत्नाने ते शक्य होणार नाही. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेना फुटीचे फार दु:ख झाले संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेना फुटीचे फार दु:ख झाले आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी भेटले खूप वाईट वाटते. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हा प्रसंग आला. ह्या लोकांनी शिवसेनाप्रमुखांना खूप त्रास दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा धाक होता. तो आता ठाकरेंबद्दल राहिला नाही. त्यांना ते जपता आले नाही. आम्हाला खूप दूर लोटले संजय शिरसाट म्हणाले की, दोन्ही पक्षांचे तार जुळत असतील तर माझा त्याला काहीच आक्षेप नाही. ज्यांचे तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील पण एकमेंकांच्या चुका माफ करून एकत्र यायला हरकत नाही. पण हे होईल का नाही हा प्रश्न आहे, असा प्रयत्न एका बाजूने होऊन चालत नाही. एका कुटुंबातील लोकं एकत्र नाही आले. आम्हाला तर इतके दूर लोटले आहे की आम्ही त्या गावचे नाहीच. आदित्यकडून हे शक्य नाही संजय शिरसाट म्हणाले की, दोन पाऊल मागे जाऊन एकमेकांना समजून घेत जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर हे होऊ शकते. कुणाला अपमानित करुन हे सर्व आजच्या काळात होऊ शकणार नाही. आदित्य ठाकरे ही गोष्ट करु शकत नाही. कारण आदित्य ठाकरेंचे वय कमी आहे. त्यांना मागचा इतिहास माहिती नाही. उद्धव ठाकरे यांना तो संघर्ष माहिती आहे. उद्धव ठाकरेंच्या फळीतील नेत्यांने केले तर ते होऊ शकते. आता जोडायची स्थिती नाही, पण इतकेही दूर गेलो नाही की एकत्र येऊ शकत नाही. पण आता काही नाही केले तर पुढे दोन रेषा दिसून येतील. ..अन् मी राजकारणात आलो संजय शिरसाट म्हणाले की, राजकारण हा माझा पिंड नव्हता. पण शहरातील दादागिरी, गुंडगिरी सुरू होती. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचे ठरवले. त्यानंतर आम्ही शिवसेना मराठवाड्यात आणली. पहिली शाखा सुरू केली. त्यावेळी शहरात जावेद, चाऊस सारखे दादा ग्रामीण भागातील लोकांना त्रास देत होते. ते कुणालाही मारत होते. पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो. आमची तेव्हा ताकद नव्हती. या चिडीचा परिणाम मी राजकारणात येण्यासाठी झाला. ..तेव्हा शिवसेनेचा मराठवाड्यात उदय झाला संजय शिरसाट म्हणाले की, शहरात शिक्षणासाठी आलेले जॉर्डनमधील लोकं मुली उचलून नेत होते. त्यांच्याकडे कुणी गेले तर उंट कापतात, पण शहरात उंट नसल्याने त्यांनी गाय कापून गोड जेवन देण्याचे सुरू केले. जवाहर कॉलनीमध्ये हा प्रकार घडला होता. त्यावेळी आम्ही त्यांच्या घरावर चालून गेलो पण पोलिसांनी त्यांना पसार केले होते. मग दोन दिवसांनी जॉर्डनसह अवैध धंद्याविरोधात आम्ही एक मोर्चा काढला. त्यात आमच्यावर दगडफेक झाली, तेव्हा दंगल पेटली. तेव्हापासून शहरातील सर्व जॉर्डन निघून गेले. आणि तेव्हा शिवसेनेचा जिल्ह्यात उदय झाला. बाळासाहेब आम्हाला वेळ देत संजय शिरसाट म्हणाले की, 1986 ते 1989 या काळात शहरात 22 दंगली झाल्या. यावेळी आम्ही अनेकदा फरार होत, शिवसेना प्रमुखांकडे जात होतो. ते आम्हाला शिवसेना भवनात मुक्कामी ठेवायचे. त्यांचे आमच्यावर खूप प्रेम होते. ते आम्हाला आठवड्यातून 2 वेळा तरी वेळ देत होते. त्यांचे राहणीमान अगदी साधे होते. पण आता ते सर्व संपले. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता घडला. ..अन् मी पहिल्यांदा आमदार झालो संजय शिरसाट म्हणाले की, मला पहिल्यापासून पदाची इच्छा नव्हती. पण सर्वांत पहिले पद घेतले ते शहर संघटक. हरसूलमध्ये उमेदवार भेटत नसल्याने मला उभे रहावे लागले. पण अवघ्या काही मतांनी माझा पराभव झाला. 2000 मध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. आमदाराकीचे तिकीट मिळाले तेव्हा मी बाळासाहेबांकडे गेलो की मला तिकीट पाहिजे, तेव्हा कार्य अहवाल घेऊन मी तिथे गेलो होतो. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की संजय हे कोण वाचतं तुझे काम काय आहे हे मला माहिती आहे. तू बस, गंगाधर गाडे, पोलिस महासंचालक हे तिकीट मागत होते, मला वाटले नव्हते तिकीट मिळेल का नाही. रात्री अडीच वाजता शिवसेनाप्रमुखांनी बोलावले आणि विचारले संजय आमदारकी लढवायची आहे का? पैसे आहेत? निवडणुकीत पैसे लागतात. अनेकांना डावलून तूला उमेदवारी देत आहे, तू निवडून आला पाहिजे हे लक्षात ठेव. जा तू कामाला लाग असे सांगितले. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते कशी निवडणूक लढवायची समजत नव्हते. पण अनेकांनी मदत केली अन् मी निवडून आलो, अन् शिवसेना प्रमुखांनी मला जवळ घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article