Published on
:
30 Nov 2024, 12:46 pm
Updated on
:
30 Nov 2024, 12:46 pm
भंडारा : धानाचे पीक आता कापणीला आले आहेत. उभे धान पिवळे पडले आहे. त्यातच मजुरांची मोठी कमतरता निर्माण झाली असून धानाचे पीक कापणीला मजूर मिळेनासे झाले आहे. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी जिल्ह्यातील मिळेल तिथून मजूर आणत आहेत.
जिल्ह्यात धानाचे पीक रोवणी क्षेत्र अधिक असून आता हलके व भारी धान पीक कापणीला आले आहेत. त्यामुळे पिकाच्या कापणीसाठी शेतकरी स्वत:च्या व शेजारच्या गावामध्ये मजुरांचा शोध घेत आहेत. अधिक मजुरी देऊन व विनंती करूनही मजूर कामाला यायला तयार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात मिळतील तिथून मजूर आणावे लागते आहे.
मजुरांच्या टंचाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पूर्वी गोंदिया, लाखनी, रामटेक, नागपूर या दूरच्या जिल्ह्यातील मजूर सहज उपलब्ध व्हायचे. अलीकडे शेजारच्या जिल्हा व तालुक्यातील मजूर धान कापणीला नकार देतात. त्यामुळे मजुरांची समस्या गंभीर रूप धारण करीत असून, मजूरांअभावी शेती करणे कठीण जात आहे.
धान गळत असल्याने मोठे नुकसान
काही शेतकऱ्यांच्या शेतीतील पीक चांगले वाळल्याने त्यांच्या लोंब्यामधील धान गळायला सुरुवात झाली आहे. गळालेले धान शेतातून उचलणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मजूर मिळत नसल्याने काहींनी घरातील सदस्यांच्या मदतीने पीक कापणीला सुरुवात केली आहे. पण घरातील दोन, तीन सदस्य पीक कापणी तरी किती करणार? क्षेत्र अधिक असल्यास त्याची पिकाची कापणी करणे दोन ते तीन दिवसात होत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात धान गळतीला सुरुवात झाली आहे.
मागील काही वर्षांपासून शेतीसंबंधी साहित्याचे दर वाढल्याने धानाच्या उत्पादन खर्चात तशीच वाढ झाली आहे. सध्या धानाचे उत्पन्न घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यातच मजुरीचे दर वाढले असूनही मजूर मिळत नाही. त्यांच्या वाहतुकीवर वेगळा खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अजून वाढतो. धानाच्या पिकाच्या कापणीचे यंत्र महागडी असल्यामुळे ते खरेदी करणे कठीण आहे.