Published on
:
29 Nov 2024, 2:14 pm
Updated on
:
29 Nov 2024, 2:14 pm
अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे पासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. येथील रेल्वे ट्रॅकला तडा गेला होता. हे लक्षात येताच ट्रॅकमॅन भोलाराम मीना याने ४०० मीटर धावत जाऊन अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस लाल झंडा दाखवून रोखली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भोलाराम मीना यांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माहितीनुसार धामणगाव रेल्वे जवळ ट्रॅक वर भोलाराम मीना हे गुरुवारी (दि.२८ नोव्हेंबर) सकाळी पाहणी करत होते. दरम्यान त्यांना रेल्वे ट्रॅकच्या एका सांध्याला फ्रॅक्चर गेल्याचे दिसून आले. काही वेळातच अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस या ट्रॅकवरून जाणार होती. त्यामुळे मीना यांनी धावत जाऊन वेळीच लाल झेंडा दाखवत एक्सप्रेस ला थांबविले. त्यानंतर २५ मिनिटानंतर याच ट्रॅक वरून अहमदाबाद पुरी एक्सप्रेस तांत्रिक सल्ल्यानुसार हळुवारपणे रवाना करण्यात आली.
दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या अनेक मेल एक्सप्रेस काही वेळासाठी प्रभावित झाल्या होत्या. या घटने संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर ते देखील घटनास्थळी पोहोचले होते. रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.