Published on
:
23 Nov 2024, 12:19 pm
Updated on
:
23 Nov 2024, 12:19 pm
धुळे | धुळे जिल्ह्यातील सर्व पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला आहे. विशेषता धुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आमदार कुणाल पाटील आणि एमआयएमचे आमदार फारुक शाह यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावळ हे चौथ्या वेळेस ,शिरपूरचे आमदार काशीराम पवार हे चौथ्या वेळेस तर साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित या दुसऱ्या वेळेस सलग विजयी झाल्या आहेत. धुळे ग्रामीण मधून राम भदाणे,आणि धुळे शहर मधून अनुप अग्रवाल हे भाजपाच्या उमेदवारीवर दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या. यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल यांची सलग तीन वेळेस आमदार असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे आणि दुसऱ्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात असणारे एमआयएमचे फारुक शाह यांच्याबरोबर लढत झाली. या निवडणुकीत धुळे शहरांमधून दोन लाख 17 हजार 564 म्हणजेच 59.70 टक्के मतदान झाले. यात एक लाख तीन हजार 948 महिलांचे मतदान होते. गेल्यावेळी भाजपाचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे आणि लोकसंग्रामचे अनिल गोटे तसेच शिवसेनेचे हिलाल माळी यांच्यात मताचे विभाजन झाले होते. त्यामुळे एमआयएमचे फारुक शाह हे 46 हजार 679 मते घेऊन विजयी झाले होते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा कमालीचा यशस्वी झाला. त्याचा परिणाम प्रत्यक्ष निकालात दिसून आला . अनुप अग्रवाल यांना तब्बल एक लाख 15 हजार एकशे पंचवीस मते मिळाली. त्यांनी तर फारुक शाह यांना 70289 आणि अनिल गोटे यांना 23496 मते मिळाली. अग्रवाल यांनी तब्बल 44 हजार 836 मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार कुणाल पाटील हे सलग तिसऱ्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते. महाविकास आघाडी तथा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीने राम भदाणे यांना उमेदवारी दिली. राम भदाने यांच्या मातोश्री माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे या गेल्यावेळी अवघ्या 14000 मतांनी पराभूत झाल्या होत्या. भदाणे परिवारामध्ये दिवंगत द. वा. पाटील यांनी पाच वेळेस आमदार पद भूषवले होते. दिवंगत आमदार पाटील यांचा मोठा समर्थक वर्ग धुळे ग्रामीण मतदारसंघात आहे. भारतीय जनता पार्टीने राम भदाणे यांना उमेदवारी दिल्यानंतर या सर्व समर्थकांच्या भेटीगाठी घेत हिंदुत्वाचा मुद्दा भदाणे यांनी प्रत्येक सभेत मांडला. त्यामुळे त्यांना दणदणीत मतांनी विजय मिळाला. अंतिम निकालामध्ये राम भदाणे यांना एक लाख 41 हजार 618 तर दिग्गज असणारे आमदार कुणाल पाटील यांना 84 हजार 684 मते मिळाली. या लढतीत तब्बल 56 हजार 934 मतांनी भदाणे यांनी कुणाल पाटील यांना पराभवाची धूळ चारली.
शिरपूर विधानसभा मतदारसंघात चौथ्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे आमदार काशीराम पावरा हे रिंगणात होते. त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आव्हान उभे केले होते. जितेंद्र ठाकूर यांनी तिसऱ्या वेळेस ही निवडणूक लढवली होती. या मतदारसंघांमध्ये विधान परिषदेचे आमदार अमरीश भाई पटेल यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमदार काशीराम पावरा हे पहिल्यांदा आमदार झाले होते. यानंतर पटेल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर सलग दुसऱ्या वेळेस आमदार काशीराम पावरा हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर निवडून आले होते. यावेळी देखील भारतीय जनता पार्टीने आमदार काशीराम पावरा यांच्यावरच विश्वास टाकला. तो विश्वास आमदार पावरा यांनी सार्थ ठरवला आहे. आमदार काशीराम पावरा यांनी एक लाख 78 हजार 73 तर जितेंद्र ठाकूर यांनी 32129 मते मिळवली .भारतीय जनता पार्टीचे काशीराम पावरा यांनी तब्बल एक लाख 45 हजार 944 मतांनी ठाकूर यांचा दणदणीत पराभव केला आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष आमदार असणाऱ्या मंजुळाताई गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्यासमोर भाजपातून नाराज असणारे मोहन सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवारी केली. तर काँग्रेसने माजी खासदार बापू चौरे यांचे सुपुत्र प्रवीण चौरे यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली. सुरुवातीला आमदार मंजुळाताई गावित या बाराव्या फेरीपर्यंत मागे पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली. अखेर आमदार मंजुळाताई गावित यांनी एक लाख 4 हजार 649 मते मिळवली .तर काँग्रेसचे प्रवीण चौरे यांना 99 हजार 65 मते मिळाली .अपक्ष मोहन सूर्यवंशी यांना 14,288 तर यशवंत मालचे यांना 5468 मते मिळाली. आमदार मंजुळाताई गावित यांचा 5584 मतांनी विजय झाला आहे.
एकूणच धुळे जिल्ह्यातील धुळे शहर ,धुळे ग्रामीण, शिरपूर आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचा धुवा उडवला. तर साक्री विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या तथा शिवसेनेच्या आ. मंजुळाताई गावित यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली आहे.