धुळे : 'देवपूर' येथे उद्या रोहिदास पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

2 hours ago 1

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

27 Sep 2024, 11:01 am

Updated on

27 Sep 2024, 11:01 am

धुळे : संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशाल खान्देशचे नेते म्हणून ठसा उमटविणारे आणि अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी शुक्रवार (दि. 27) रोजी वृध्दापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र आणि संपूर्ण खान्देशावर शोककळा पसरली आहे. शनिवार (दि. 28) रोजी सकाळी 11 वा. त्यांच्यावर धुळे शहरातील देवपूर येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात प्रदिर्घकाळ मंत्री म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेले माजी मंत्री तथा खान्देशचे नेते रोहिदास चुडामण पाटील यांनी शुक्रवार (दि. 27) धुळ्यातील राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. यावेळी त्यांच्याजवळ त्यांच्या धर्मपत्नी सौ.लताताई रोहिदास पाटील, ज्येष्ठ सुपूत्र विनय रोहिदास पाटील, आ.कुणाल रोहिदास पाटील, जावाई डॉ.चंद्रशेखर पाटील, मुलगी सौ.स्मिता चंद्रशेखर पाटील, स्नुषा सौ.ऋची विनय पाटील,सौ.अश्‍विनी कुणाल पाटील यांच्यासह त्यांचे नातवंडे व आप्तेष्ट,निकटवर्तीय उपस्थित होते. निधनाचे वृत्त वार्‍यासारखी जिल्हयात सर्वदूर पसरले. आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तालुकाभरातून ओघ त्यांच्या दर्शनासाठी निवासस्थानाकडे सुरु झाला.माजी मंत्री स्व.रोहिदास चुडामण पाटील यांचे पार्थिव दर्शन नेहरु हौसिंग सोसायटी, देवपूर धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात उद्या शनिवार दि.28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घेता येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार दि.28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता नेहरु हौसिंग सोसायटी, देवपूर धुळे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांनतर त्यांच्या पार्थिवावर एसएसव्हीपीएस कॉलेजच्या मैदांनावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धुळे शहराजवळील मोहाडी येथील रवंदळे परिवारात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा दि.13 जून 1940 रोजी जन्म झाला.वडील स्व.चुडामण आनंदा पाटील हे एक स्वातंत्र्य सेनानी व काँग्रेस पक्षाचे खासदार होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी इंदौर(म.प्र.) येथील जी.एस.टी.आय.महाविद्यालयात बी.ई. मॅकेनिकलची पदवी संपादन केली.शिक्षणानंतर सुरुवातीच्या काळात पाटील बंधू या फर्मखाली मोटार सायकलीची एजन्सी सुरु केली.राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी युवक काँग्रेसच्या चळवळीपासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.अखेरच्या श्‍वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून वडीलांचा राजकीय वारसा त्यांची सक्षम आणि तितकाच प्रभावीपणे चालविला.

सन 1972 साली मुकटी ता.धुळे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली राजकीय कारकिर्द माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी सुरु केली. काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसपासून सुरु झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारापर्यंत झाला. स्वातंत्र्य सेनानी स्व.अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या राजकीय निवृत्तीनंतर तेव्हाच्या कुसूंबा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री रोहिदास पाटील सन 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून सन 2009 पर्यंत सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळविला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. एकनिष्ठ, निष्कलंक, धडाकेबाज निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता. महसुल राज्यमंत्री म्हणून 12 मार्च 1986 साली त्यांची पहिल्यांदा राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या राजकीय कारकिर्दीत माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कृषी व फलोत्पादन मंत्री, कामगार, रोजगार आणि ग्रामविकास मंत्री, पाटबंधारे मंत्री, गृहनिर्माण, पुर्नबांधणी संसदीय कार्य मंत्री, कृषी व पशुसंवर्धन अशा विविध खात्यांचे त्यांनी मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. तब्बल 22 वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात सहभागी होते.कृषी आणि पाटबंधारे तसेच गृहनिर्माण म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले आहेत. मंत्रीपदाच्या कार्यकाळात धडाकेबाज निर्णय घेण्यात आणि त्यांची अंमलबाजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून सन 1998-99 मध्ये उत्कृष्ठ संसदपटू म्हणून माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता.

जिल्हा परिषद सदस्य,धुळे बाजार समितीचे सभापती,धुळे खरेदी विक्री संघाचे चेअरमन, जिल्हा बँक संचालक, महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन संचालक, इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑप-संस्था नवी दिल्लीचे संचालक अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य,राष्ट्रीय पातळीवरील संस्थेवर माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी यशस्वीपणे कामकाज सांभाळले होते.

मातब्बर नेते म्हणून नावलौकीक

स्व.इंदिरा गांधी,स्व.राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी थेट संपर्क असल्याने त्यांचा राज्यातील राजकारणात दबदबा होता. माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री शरद पवार,स्व.सुधाकरराव नाईक,स्व.विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी मंत्री म्हूणन रोहिदास पाटील यांनी आपली वेगळीच छाप सोडली होती. माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंग,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, माजी राज्यपाल बलराम जाखड अशा विविध राज्यातील नेत्यांशीही माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबध होते.

स्वातंत्र्य सेनानी माजी खा.चुडामण आण्णा पाटील यांचा वारसा पुढे नेत माजी मंत्री रोहिदास पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ खंदे शिलेदार म्हणून राहिले. आ.कुणाल पाटील यांच्यामाध्यमातून आज त्यांची तिसरी पिढी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करीत आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे आली मात्र कॉग्रेसशी निष्ठा ठेवत रोहिदास पाटील हे काँग्रेस पक्षाशी अखेरच्या श्‍वासापर्यंत एकनिष्ठ राहिले. स्व.इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधींपासून तर सोनिया गांधीपर्यंत त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले. महाराष्ट्राबरोबरच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मजबुत करण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षासाठी केलेले काम महत्वपूर्ण ठरले.

अक्कलपाडा प्रकल्पाची निर्मिती

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या राजकीय आयुष्यातील अक्कलपाडा प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरला. अक्कलपाडा प्रकल्प हा माझा श्‍वास आहे, असे ते नेहमीच म्हणत असे. अक्कलपाडाच्या जन्मापासून ते पूर्णत्वापर्यंत त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे माजी मंत्री रोहिदास पाटील यांची अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली. आज या अक्कलपाडा धरणामुळे धुळे तालुक्याचा सिंचनाच्या क्षेत्रात कायापालट झालेला असून त्यामुळे धुळे शहराचा पाणी प्रश्‍नही सुटला आहे. त्याचबरोबर शिरुड-बोरकूंड परिसरातील शेतीला पाणी मिळावे ,म्हणून गिरणा धरणाचे पाणी धुळे तालुक्यातील शेतीसाठी आणले. गिरणा पांझण डाव्या कालव्याचे पाणी शिरुड पटट्यात टाकून शेती सुजलाम सुफलाम केली. सिंचन चळवळीच्या क्षेत्रात महाराष्ट्रात नावलौकीक मिळविलेला जवाहर पॅटर्न ही सिंचन चळवळ माजी मंत्री रोहिदास पाटील यांचीच संकल्पना होती. माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत नदी-नाल्यांचे दुरुस्ती व खोलीकरण,तसेच विविध छोटेमोठे पाझर तलाव, बंधारे यांचे खोलीकरण-रुंदीकरण करुन जमीनीतील पाण्याची पातळी वाढवून शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून तब्बल चारशेपेक्षा अधिक बंधार्‍यांचे खोलीकरण व दुरुस्ती या चळवळीतून करण्यात आले.

महाराष्ट्राच्या विधानसभेपासून दिल्लीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी खान्देशाचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडले.खान्देशातील विकासाचा अनुषेश भरुन निघावा म्हणून खान्देश विकास महामंडळाची स्थापना व्हावी यासाठी ते नेहमीच आग्रही होते. माजी मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने उत्तर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय मंत्री,आमदार,खासदार यांना एकत्र करुन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,सोनिया गांधी, शरद पवार यांची भेट घेवून खान्देश विकास महामंडळासह,मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला मंजुरी देणे, सुलवाडे जामफळ उपसासिंचन योजनेसाठी निधी देणे अशा विविध मागण्या त्यांनी वारंवार लावून धरल्या होत्या. महाराष्ट्राच्या विधानसभेतही खान्देशातील प्रश्‍नांसाठी आवाज उठवित लढा दिला होता. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात विशाल खान्देशचे नेते म्हणून संबोधले जाऊ लागले.

धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी धुळे शहर,धुळे तालुका आणि जिल्ह्यासह मुंबई, नाशिक येथे शिक्षणाचे मोठे जाळे निर्माण केले. जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, शिवाजी विद्याप्रसारक संस्था, धुळे, जवाहर एज्यूकेशन सोसायटी मुंबई अशा शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून उच्च शिक्षणापर्यंत संधी उपलब्ध करुन दिली. ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये माध्यमिक विद्यालये तसेच धुळे शहरात शिवाजी विद्याप्रसारक संस्थेची इंग्रजी माध्यमातील शाळा,पदवी पदव्यूत्तर महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करुन शिक्षणाची दालने सर्वसामान्यांसाठी त्यांनी खुली करुन दिली. जवाहर मेडीकल फाउंडेशनचे ए.सी.पी.एम. मेडीकल आणि दंत महाविद्यालय सुरु करुन वैद्यकीय शिक्षणाची सोय धुळे शहरात उपलब्ध करुन दिले. गोरगरीब जनतेला अल्पदरात तसेच मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी जवाहर मेडीकल फाउंडेशनच्या रुग्णालय सुरु केले. त्याचा लाभ आज शेकडो गरजू रुग्णांना होत आहे.

धुळे शहरात,जिल्हयात विविध शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्था सुरु करुन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी धुळे तालुक्यातील व जिल्हयातील बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन दिली. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी सुतगिरणी सुरु करुन धुळे तालुक्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. देशातील अव्वल दर्जाची सुतगिरणी म्हणूनही या सुतगिरणीने नावलौकीक मिळविला. सोबत अनेक सहकारी प्रकल्प उभारुन त्याकाळी अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article