धुळे शहर-ग्रामीणसह शिंदखेड्यात भाजपचाच झेंडा, तीनही जागांवर विजय File Photo
Published on
:
23 Nov 2024, 10:32 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:32 am
धुळे | धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे राम भदाणे यांनी त्यांचा पन्नास हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. तर शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे काशीराम पावरा आणि शिंदखेडा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावळ यांनी एकतर्फा विजय मिळवला आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून यापूर्वी राज्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी त्यांचे वर्चस्व राखले होते .त्यांचा वारसा पुढे आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून चालवला. मात्र या निवडणुकीमध्ये आमदार कुणाल पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. कुणाल पाटील यांना 84 हजार 684 मते मिळाली असून भारतीय जनता पार्टीचे राम भदाणे यांनी एक लाख 41 हजार 618 मते मिळवली असून त्यांना 56 हजार 934 मतांच्या फरकाने पराभूत केले आहे.
शिंदखेडा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावळ यांनी एक लाख 50 हजार 497 मते मिळाली .तर महाविकास आघाडीचे संदीप बेडसे यांना 54 हजार 981 मते मिळाली. आमदार रावळ यांनी एक लाख 38 हजार 720 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार फारुक शाह यांना देखील पराभवाच्या धक्का बसला. भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांनी तब्बल एक लाख 15 हजार 125 मते मिळवत एमआयएमचे आमदार फारुक शाह यांना 44 हजार 836 मतांच्या फरकाने पराभूत केले. आमदार शाह यांना 70,289 मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांना 23496 मते मिळाली.