Published on
:
23 Nov 2024, 10:58 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:58 am
नंदुरबार - 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी अंती घोषित झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी भाजपाला दोन्ही विधानसभा मतदारसंघ राखण्यात यश मिळाले असून एकंदरीत महायुतीला जागांवर विजय प्राप्त झाला आहे. तथापि लढवलेल्या चार पैकी तीन ठिकाणी काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला असून महाविकास आघाडीला एकमेव नवापूर विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त झाला आहे.
अक्कलकुवा शहादा नवापूर आणि नंदुरबार असे चार विधानसभा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात समाविष्ट आहेत. त्यापैकी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुती चे उमेदवार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी निवडून येण्याचा विक्रम स्थापित करीत दणदणीत विजय प्राप्त केला. शहादा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी देखील 53 हजार मतांची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला. हे दोन्ही मतदारसंघ भाजपाच्या हक्काचे आहेत. नवापूर विधानसभा मतदारसंघात मात्र महायुती चे म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत गावित पराभूत झाले. या ठिकाणी महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीष नाईक हे विजयी झाले आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी हे विजयी झाले. या ठिकाणी चौरंगी लढत रंगली होती. काँग्रेसचे या उमेदवार माजी मंत्री के सी पाडवी, अपक्ष उमेदवार माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि भारतीय आदिवासी पार्टीचे उमेदवार माजी मंत्री पद्माकर वळवी हे पराभूत झाले.
डॉक्टर गावित यांचा विक्रम
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतांची आघाडी घेत एकूण मते प्राप्त करून दणदणीत विजय प्राप्त केला आहे. विरोधकांनी त्यांच्या घराणेशाहीवर रान वाजवले असताना आणि पक्षांतर्गत मोठी धूसपुस असतानाही त्यांनी मिळवलेली मते लक्षणीय असून त्यांच्या विकास कार्यावर मतदारांनी दर्शवलेला हा विश्वास मानला जात आहे. डॉक्टर विजयकुमार गावित हे सलग सहा वेळा आमदारपदी निवडून आले आणि आता सलग सातव्यांदा त्यांनी विजय प्राप्त करून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील विक्रम स्थापित केला आहे. सलग सात वेळा निवडून आलेले या मतदारसंघातील ते पहिले आमदार आहेत. 2009 ते 2014 हे पाच वर्ष आणि मागील अडीच वर्ष महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली.
दरम्यान आज मतमोजणी प्रसंगी पहिल्या फेरीपासून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आघाडी राखली. महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी देण्यात आली होती तथापि प्रत्यक्ष त्यांना उल्लेखनीय मते मिळवता आले नाही हे प्रत्येक फेरीत दिसून आले.
अक्कलकुव्यात होती काट्याची टक्कर
या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार के सी पाडवी हे आठव्यांदा निवडणूक लढले सलग सात वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी या ठिकाणी केला असल्यामुळे काँग्रेसचे ते प्रस्थापित नेतृत्व मानले जाते. लोकसभा निवडणुकीत नुकत्याच पराभूत झालेल्या भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांनी भाजपाचा राजीनामा देत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढवून त्यांना मोठ्या आव्हान उभे केले होते. या दोघांमधील चुरस रंगलेली असताना एकनाथराव शिंदे गटाचे आमच्या पाडवी यांनी जबरदस्त लढत दिल्याचे चित्र बाराव्या फेरीनंतर स्पष्ट झाले. या लढतीत डॉक्टर हिना गावित यांनी दिलेली टक्कर सर्वात लक्षवेधी ठरली. प्राप्त आकडेवारीनुसार आमश्या फुलजी पाडवी 72 हजार 411 मते प्राप्त केली असून 3 हजार 289 मतांची आघाडी घेतली. डॉ. हिना विजयकुमार गावित यांना 66 हजार 746 मते, के.सी. पाडवी यांना 69,122 मते, तर पद्माकर वळवी यांना आठ हजार सहाशे चाळीस मते मिळाले.
शहादा मतदारसंघात राजेश पाडवी दुसऱ्यांदा विजयी
शहादा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी यांनी ५३२०४ इतक्या भरघोस मतांची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे. येथे काँग्रेस उमेदवार राजेंद्र कृष्णराव गावित यांनी समोरासमोर त्यांना लढत दिली.
पोलीस दलाचा राजीनामा देऊन राजेश पाडवी यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि पहिल्यांदाच विधानसभेची उमेदवारी केली होती त्यावेळी शहादा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. या पहिल्या टर्म मध्येच त्यांनी केलेली विकास कामे आणि पक्षासाठी केलेले प्रयत्न यामुळे शहादा व तळोदा तालुक्यात त्यांचा चांगला संपर्क स्थापित झाला त्या बळावरच महायुतीने त्यांना या निवडणुकीत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राजेंद्र कृष्णराव गावित यांनी काँग्रेस तर्फे उमेदवारी केली राजेंद्र गावित हे भाजपाचे प्रदेश सदस्य होते तथापि उमेदवारी मिळत असल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐनवेळी भाजपातून आलेल्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिल्याच्या नाराजीतून काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याचा परिणाम मतपेटीवर दिसला. घोषित निकालानुसार भाजपा उमेदवार राजेश पाडवी यांना 1 लाख 46 हजार 839 मते प्राप्त झाली. काँग्रेस उमेदवार राजेंद्रकुमार कृष्णराव गावित यांना 93 हजार 635 मतें मिळाली.