लोहा विधानसभेची उद्या २० टेबलवर मतमोजणी होणार आहे.
Published on
:
22 Nov 2024, 2:20 pm
Updated on
:
22 Nov 2024, 2:20 pm
लोहा : लोहा विधानसभा मतदार संघात ३ लाख १६५० पैकी २ लाख २६ हजार ८३७ मतांची मतमोजणी शनिवारी (दि.२३) सकाळी आठ वाजल्यापासून तहसील कार्यालयात होणार आहे. १४ टेबल ६ टपाली असे एकूण २० टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टेबलवर २५ तर ३ ते १४ टेबलवर २४ अशा मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येक टेबलावर मायक्रो ऑब्झर्व्ह राहणार आहेत.
ईव्हीएम मतदान मोजणी १४ टेबलावर होणार असून टपाली मतदानासाठी सहा टेबल आहेत. अगोदर टपाली मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक, मायक्रो ऑब्झर्व्ह व महसूल सेवक अशी टीम असणार आहे. मायक्रो ऑब्झर्व्ह हे राष्ट्रीयकृत बँक व एलआयसी मधील अधिकारी व कर्मचारी यावेळी असतील. झोनल ऑफिसरही मतमोजणीसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ५६ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
मतमोजणीसाठी केंद्रीय ऑब्झर्व्ह म्हणून हरियाणा राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी महेंद्र पाल हे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार , सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नायब तहसीलदार अशोक मोकले नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
ईव्हीएम साठी त्रिस्तरीय सुरक्षा
लोहा प्रशासकीय इमारतीत ईव्हीएम यंत्र असणाऱ्या ठिकाणी तीन स्तरीय शस्त्रधारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहारा असणार आहे. सीआरएफ व एसआरपी जवान अशा १४० कर्मचाऱ्यांचा त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्यात आला आहे
मतमोजणी केंद्रात एका उमेदवारास २२ प्रतिनिधी पाठविता येणार आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. डीवायएसपी डॉ. अश्विनी जगताप याच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्र परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. १५ अधिकारी, ११० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच शहरातील प्रमुख नेत्याच्या कार्यालयात बंदोबस्त लावण्यात आला आहे.