नागपुरात सकाळी पहिल्या तीन तासांत विविध राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी मतदान केले. Pudhari Photo
Published on
:
20 Nov 2024, 7:59 am
Updated on
:
20 Nov 2024, 7:59 am
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरात बुधवारी (दि.२०) सकाळी पहिल्या तीन तासांत विविध राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी मतदान केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही इतर विषय, राजकीय बोलणे टाळत अधिकाधिक लोकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ, नितीन राऊत, शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, मोहन मते, गिरीश पांडव आदींनी कुटुंबीयांसह पहिल्या टप्प्यातच मतदान केले. सकाळी नऊ पर्यंत सरासरी सात टक्के तर सकाळी 11 पर्यंत सरासरी 19% मतदान झाले. काटोल येथील घटनेनंतर जिल्ह्यात प्रशासन पोलीस यंत्रणा सतर्क असली तरी ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु दिसली. काटोल, कळमेश्वर, सावनेर या भागात शांततेत मतदान सुरू होते. महिलांमध्ये तरुण मतदारात विशेष उत्साह दिसला.
मतदारसंघनिहाय उमेदवार आणि मतदार
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 217 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात काटोल 17, सावनेर 18, हिंगणा 18, उमरेड 11, नागपूर दक्षिण-पश्चिम 12, नागपूर दक्षिण 22, नागपूर पूर्व 17, नागपूर मध्य 20, नागपूर पश्चिम 20, नागपूर उत्तर 26, कामठी 19, रामटेक 17 असे एकूण 217 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्ह्यात सहाय्यकारी मतदान केंद्रांसह 4 हजार 631 मतदान केंद्रे असणार आहेत. यात काटोल 332, सावनेर 370, हिंगणा 476, उमरेड 395, कामठी 530, रामटेक 359, नागपूर दक्षिण-पश्चिम 384, नागपूर दक्षिण 350, नागपूर पूर्व 368, नागपूर मध्य 308, नागपूर पश्चिम 351, नागपूर उत्तर 408 अशी एकूण 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.
दरम्यान, काटोल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 367, सावनेर 3 लाख 21 हजार 817, हिंगणा 4 लाख 50 हजार 141, उमरेड 3 लाख 957, नागपूर दक्षिण-पश्चिम 4 लाख 11 हजार 241, नागपूर दक्षिण 3 लाख 94 हजार 425, नागपूर पूर्व 4 लाख 18 हजार 981, नागपूर मध्य 3 लाख 41 हजार 169, नागपूर पश्चिम 3 लाख 88 हजार 353, नागपूर उत्तर 4 लाख 28 हजार 845, कामठी 5 लाख 1 हजार 770, रामटेक 2 लाख 86 हजार 931 असे एकूण 45 लाख 25 हजार 997 मतदार आहेत.