Published on
:
22 Nov 2024, 1:21 pm
Updated on
:
22 Nov 2024, 1:21 pm
नागपूर : विधानसभा निवडणुकीची उद्या शनिवारी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होणार आहे. काटोलचा निकाल १७ फेऱ्यांनी सर्वात आधी तर उत्तर नागपूरचा सर्वाधिक ३० फेऱ्यांनी शेवटी मिळण्याची शक्यता आहे. नागपूर शहरातील सहा आणि ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभानिहाय वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे.
काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि भाजपचे चरण सिंग ठाकूर यांच्यातील उत्कंठावर्धक लढत आहे. उत्तरमध्ये काँग्रेसनेते माजी मंत्री नितीन राऊत विरुद्ध भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे अशी लढत आहे. पहिल्या फेरीचा निकाल हाती पडण्यास जवळपास ४५ मिनिटे कालावधी लागण्याची शक्यता जिल्हा निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी होईल आणि काही वेळाने ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मिळालेली उमेदवारनिहाय मते जाहीर होतील. विधानसभा मतदार संघ निहाय मतमोजणी केंद्र आहेत. सकाळी ७ वाजता ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. मोजणीच्या एका टेबलवर दोन कर्मचारी राहणार आहेत. एक सूक्ष्म निरीक्षकही असणार आहे. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील बाराही मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली.
प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी करण्यात येईल. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या परिसरात जमाव बंदी आदेश निर्गमित केले आहेत. सुरक्षा पासेस देण्यात आलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
दक्षिण-पश्चिम २८, नागपूर दक्षिण २५, नागपूर पूर्व २७, नागपूर मध्य २२, नागपूर पश्चिम २६, नागपूर उत्तर ३०, काटोल १७, सावनेर २७, हिंगणा २४, उमरेड २०, कामठी २७, रामटेक २६