Published on
:
23 Nov 2024, 1:59 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:59 pm
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 12 जागांचा विचार करता नागपूर शहरातील सहापैकी 4 जागा भाजप तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. दक्षिण पश्चिमची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव करून पुन्हा जिंकली. फडणवीस यांची ही सहावी निवडणूक आहे.
दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे मोहन मते यांची काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्या विरोधात विजयी घोडदौड सुरू आहे. पूर्व नागपुरात भाजपचे कृष्णा खोपडे चौथ्यांदा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेत. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे, अजितदादा गटाच्या आभा पांडे, काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे या सर्वांचा त्यांनी दारुण पराभव केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपूर जिंकत काँग्रेसची लाज राखली. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर त्यांनी 6137 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे बंडखोर नरेंद्र जीचकार यांनी त्यांचा मार्ग रोखण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला.
उत्तर नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी माजी आमदार भाजपचे डॉ मिलिंद माने यांचा पराभव केला. बसपाचे मनोज सांगोळे निष्प्रभ ठरले. शहरातील चार जागा पुन्हा एकदा भाजपला तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या. दुसरीकडे ग्रामीणमध्ये गेल्यावेळी कामठी आणि हिंगणा या दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला या जागांसोबतच काटोल, सावनेर अशा चार तर शिवसेना शिंदे गटाला रामटेक ची जागा मिळाली. काँग्रेसला उमरेडची जागा जिंकण्यात यश आले. कामठी मध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे सुरेश भोयर यांना पराभूत केले.
काटोलमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा पराभव करीत भाजपचे चरण सिंग ठाकूर, सावनेरमध्ये भाजपचे आशिष देशमुख काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना पराभूत केले. रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल यांनी काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा पराभव केला. राज्यभरात चर्चा होऊनही सांगली पॅटर्न यशस्वी होऊ शकला नाही.