महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ANI X Photo
Published on
:
23 Nov 2024, 1:09 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:09 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अनाकलनीय असा लागला आहे. त्यामुळे आता तरी भाजपचा अस्सल मुख्यमंत्री होईल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.२३) निकालानंतर दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहे. पटलं नाही तरी लागला आहे. जे जिंकले त्यांचे मी अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे मते दिली त्यांचे आभार मानतो. लाटेपेक्षा त्सुनामी आली, असा हा निकाल आहे. जे काही आकडे दिसत आहेत. ते पाहिल्यावर या सरकारला अधिवेशनात एकापेक्षा अधिक बील मांडत येईल, अशी परिस्थिती आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते की, एकच पक्ष राहिला पाहिजे. थोडक्यात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही, यावरून या निकालावरून दिसत आहे.
लोकांनी महायुतीला मत का दिले. सोयाबीन, कापूस खरेदी होत नाही म्हणून दिली का? की, कोणत्या रागापोटी अशी ही लाट उसळी हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय असा आहे, याचे गुपित शोधल्याशिवाय समजणार नाही. जनतेने धीर धरावा. आम्ही जनतेसोबत आहोत. लाडकी बहीण योजनेचे यश असेल. तर बाकीच्या गोष्टी उघड आहेत. राज्यात बेरोजगारी बेकारी आणि अत्याचार वाढत आहेत. लाडकी बहीण आमच्या सभेला पण येत होती. महागाई वाढत आहे. राज्यात बेकारी आहे, महागाई आहे.
जनतेल आम्ही वचन देती की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आजचा निकाल जनतेला पटला का ? हा प्रश्न आहे. आता एकनाथ शिंदेंना फडणवीस यांच्या हाताखाली काम करावे लागेल. लोकसभेतील निकाल आता कसा काय बदलू शकतो, असा सवाल आहे. आमच्या सभेत गर्दी होत होती. तर मोदी, शहांच्या सभेतून लोक निघून जात होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. सर्वांचे १७ सी फॉर्म तपासले पाहिजे, यानंतर समजेल की टक्केवारी किती वाढले, असेही ठाकरे म्हणाले.
आता शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती करावी लागेल. लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे लागेल. ते देतात का हे पाहू. कोरोनाच्या काळात कुटुंब प्रमुख म्हणून ऐकणारा महाराष्ट्र असे वागेल, असे मला वाटत नाही. मला विश्वास नाही नक्की काहीतरी घडले आहे, अशी शंका ही ठाकरे यांनी व्यक्त केली. पक्ष फुटीवर अडीच वर्ष होऊन न्यायालयात निकाल मिळत नाही. त्यापूर्वी निवडणूक घेतली जाते, हीच तर खरी गफलत आहे, असे ते म्हणाले.