निफाड तालुक्यात थंडी पासून बचावासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.छाया- राकेश बोरा
Published on
:
30 Nov 2024, 4:16 am
लासलगाव वृत्तसेवा | देशातील उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट आहे. अशात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. वातावरणातील या बदलाचा फटका निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्याला बसला आहे. निफाड ला ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली असून या हंगामातील नीचांकी तापमान असल्याचे दिसून आले आहे.
वातावरणातील या बदलाचा फटका राज्यासह निफाड तालुक्यातील तापमानावर झाला आहे. परिणामी तापमानात कमालीची घट झाली आहे. अनेक जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या जवळपास आला आहे. तर निफाडचे तापमान सात अंश सेल्सिअस वर येऊन पोहचले असून या बोचऱ्या थंडीने मात्र नागरिकांना हुडहुडी भरली असल्याचे दिसत आहे.
महाबळेश्वर आणि लोणावळ्यासारखे तापमान निफाड तालुक्यात घटले आहे. दुसरीकडे द्राक्ष पंढरीत तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.
यंदा हिवाळ्याची चाहूल उशीरा लागली असली तरी नोव्हेंबर अखेर थंडीने चांगलाचा जोर धरला. तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तापमान कमी झाल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक शेकोट्यांचा आधार घेत आहे.
१७ नोव्हेंबर -१५.५ अंश सेल्सिअस
१८ नोव्हेंबर -१२.७ अंश सेल्सिअस
१९ नोव्हेंबर -१०.९ अंश सेल्सिअस
२१ नोव्हेंबर -१०.५ अंश सेल्सिअस
२५ नोव्हेंबर - १० अंश सेल्सिअस
२६ नोव्हेंबर - ८.८ अंश सेल्सिअस
२७ नोव्हेंबर - ८.३ अंश सेल्सिअस
२९ नोव्हेंबर - १०.१ अंश सेल्सिअस
३० नोव्हेंबर - ७ अंश सेल्सिअस