आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीतील नेत्यांवर टीका केली आहे. Pudhari Photo
Published on
:
29 Nov 2024, 11:51 am
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षातील एकही नेता माझ्यासोबत नव्हता. भाजप नेते सोबत नव्हते. पण आमचे केंद्रीय राज्यमंत्रीही (प्रतापराव जाधव) आमच्या सोबत नव्हते. भाजपचे संजय कुटे व केंद्रीय राज्यमंत्री यांनी तर माझ्या विरोधातील उमेदवाराचे तिकिट फायनल केले, असा घणाघाती आरोप शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड यांनी केला. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एक लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येणार असा दावा करणा-या संजय गायकवाड यांचा अवघ्या ८४१ मतांच्या फरकाने निसटता विजय झाला. ही बाब जिव्हारी लागल्याने आमदार गायकवाड यांनी जिल्ह्यातील भाजप नेते तसेच शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर सडेतोडपणे आरोपांचे वाग्बाण सोडले आहेत.
गुरूवारी शहरातील गजानन महाराज मंदिरासमोर आमदार गायकवाड यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आज शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. आमदार गायकवाड यांनी मतदारसंघात करोडो रुपयांची विकास कामे करूनही शिवसेना ठाकरे गटाच्या नवख्या उमेदवार जयश्री शेळके यांनी त्यांना कडवी झुंज दिली. कसेबसे काठावरच्या मतांनी राजकीय जीवनदान मिळालेल्या गायकवाड यांच्या मनातील अस्वस्थता अखेर बाहेर पडली.
दरम्यान आमदार गायकवाड यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबतच, त्यांचे शिवसेनेतील गॉडफॉदर असलेले केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही आपल्या निसटत्या विजयाचे 'अपश्रेय' दिले आहे.