संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळयानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात 728 दिवे लावून दीपोत्सव साजरा करीत माऊलींच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. दीपोत्सवाने मंदिर परिसर उजळला होता. आळंदी येथून पायी आणलेल्या ज्योतीने पणत्यां प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात गुरुवारी (दि.28) सायंकाळी 6.30 वाजता हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी देवीदास महाराज म्हस्के, आमदार विठ्ठलराव लंघे व रत्नमाला लंघे, डॉ.तेजश्री लंघे यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले. यावेळी माऊलींचा जयघोष करत उपस्थित भाविकांनी एक दीप लावून संजीवन समाधी सोहळयानिमित्त माऊलींच्या स्मृतीस अभिवादन केले.
पैस खांबाचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे मार्गदर्शक वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के, गणेश लंघे, सतीश कर्डिले, डॉ.करणसिंह घुले, डॉ.संजय सुकाळकर, बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, विश्वस्त भिकाजी जंगले, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, भैय्या कावरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ॐ आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीत दीप लावण्यात आले. त्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या प्रवेशद्वारावर उपस्थित माऊली भक्त व सेवेकरी भाविकांच्या हस्ते 728 दीप प्रज्वलित करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर दीप प्रज्वलित करून तो लावण्यासाठी करजगाव येथील संत किसनगिरी भक्त मंडळातील सेवेकर्यांनी सेवा दिली.
डॉ.भाऊसाहेब घुले व परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुणे येथील पूनम नळकांडे-पाटील यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान व समर्पण फाउंडेशनने हा कार्यक्रम घेतला. यावेळी जीवन गौरव पुरस्कार वितरण झाले. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी प्रास्ताविक केले.
‘हे विश्वची माझे घर‘चा संदेश
संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्री क्षेत्र नेवासा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना करून विश्वाला न्हावू घालणार्या शब्दांना येथेच जन्म दिला. हे विश्वची माझे घर असा संदेश याच नगरीतून दिला गेल्याने या क्षेत्राला वारकरी संप्रदायात अधिक महत्व असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त देवीदास महाराज म्हस्के यांनी सांगितले.