पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन. File Photo
Published on
:
20 Nov 2024, 2:53 am
Updated on
:
20 Nov 2024, 2:53 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आणि नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आज पार पडत आहे. ९ कोटींहून अधिक मतदार कुणाला मतदान करतील, निवडणूक निकालानंतर सत्ता कोणाला मिळणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की, त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी. यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमधून केले आहे.
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे.राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी.यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने…
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2024राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात सर्वाधिक ७२ मतदारसंघांत थेट लढत होत आहे. त्याखालोखाल ५१ मतदारसंघांत दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. विशेष म्हणजे, शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात लढत असलेल्या जागांपेक्षा अधिक जागांवर भाजपविरोधात लढत आहे! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ही भाजपविरोधात ४१, तर राष्ट्रवादी (अजित पवार) विरोधात ३७ मतदारसंघांत लढत आहे. राज्याच्या सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो, असे मानले जाते. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्हींचा विदर्भावर पकड मजबूत करण्यासाठी संघर्ष सुरू असून, विदर्भातील ६२ पैकी ३४ मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजप आमने- सामने आहेत. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी १० जागांवर काँग्रेस आणि भाजप, तर ९ जागांवर दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. मुंबईतील ३६ जागांसाठी महायुती व महाविकास यांच्यात तीव्र चुरस दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध महायुती असा सामना मुंबईत प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.