कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचं वैवाहिक जीवन सर्वात महत्त्वाचं असतं. त्याच्या गृहस्थी जीवनाची गाडीच त्यावर टिकलेली असते. नातं म्हटलं तर त्यात प्रेम, गोडवा, रुसवा हा आलाच. पती-पत्नीचं नातंच असंच असतं. आर्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात पती-पत्नीच्या नात्याची मजबूती आणि मर्यादा कायम राखण्यासाठी, पत्नीने कधीही तिच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित काही गोष्टी सार्वजनिकपणे कधीही शेअर करू नयेत, असं म्हटलं आहे. चला, तर मग जाणून घेऊया, त्या गोष्टी कोणत्या आहेत.
वैयक्तिक नातेसंबंध शेअर करू नका
पती-पत्नीच्या नात्यात कधी प्रेम असते, तर कधी तणाव. दोघांनी मिळून गृहस्थीचा गाडा चालवायचा असतो. त्यामुळे कधी ना कधी मतभेद होऊ शकतात. परंतु या सर्व गोष्टी पती-पत्नीच्या खास गोष्टी असतात आणि त्या सार्वजनिकपणे कोणासमोर आणता कामा नये. आपलं नातं चांगलं आहे की वाईट? हे दुसऱ्यांना सांगायचं टाळा. चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीच्या गोष्टी अत्यंत वैयक्तिक असतात, त्या दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने नात्यात नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
शारीरिक समस्यांचा उल्लेख टाळा
चाणक्य नीतीनुसार, बायकोने कधीही आपल्या नवऱ्याच्या शारीरिक समस्यांचा इतरांसमोर उल्लेख करू नये. चाणक्य म्हणतात, जी स्त्री तिच्या नवऱ्याच्या शारीरिक समस्यांची चर्चा इतरांसमोर करते, तिला फक्त कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्या समस्यांचं निवारण करणार नाही. उलट तुमच्या पाठीमागे तुमची खिल्ली उडवेल. तसेच, तुमच्या पडत्या बाजूही उघड होतील, ज्यामुळे तुमच्या नात्यात फूट पडू शकते.
आर्थिक स्थिती
चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीने मिळूनच गृहस्थी चालवायला हवी असते. यासाठी कोणीही मदत करत नाही. त्यामुळे पत्नीने कधीही आपल्या नवऱ्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख इतरांसमोर करू नये. तुमच्या घरी पैसे भरपूर असले तरी किंवा तुम्ही आर्थिक अडचणीत असलात तरीही या बाबींचा उल्लेख इतरांसमोर करू नका. याशिवाय, नवऱ्याच्या उत्पन्नाची स्थिती किंवा त्याची कमाई कशी आहे, याबद्दल माहिती इतरांसोबत शेअर करणे टाळा.