गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे विशाल कदम यांचा पराभव केल्यानंतर मोठी विजयी रॅली काढली.pudhari photo
Published on
:
23 Nov 2024, 1:51 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:51 pm
परभणी : मराठवाड्यासह राज्यात महायूतीला दणदणीत यश मिळाल्याचे चित्र समोर आले असताना जिल्हयातील चारपैकी तीन जागा मिळविण्यातही महायुतीला जबरदस्त यश आले आहे. मागील निवडणुकीत 50 टक्क्यांवर असलेली महायूती एका जागेच्या वाढीमुळे 75 टक्क्यांच्या वर जावून पोहचली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला मात्र मागील तुलनेत एक जागा गमवण्याची वेळ आल्याने या आघाडीला मोठा झटका बसला आहे. केवळ परभणीच्या जागेमुळे महायूतीला संपुर्ण जिल्हा काबीज करण्यात यश मिळाले नाही.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर चारपैकी जिंतूर व गंगाखेड या दोन जागांवर महायूतीने यश मिळविले होते. तर पाथरी व परभणी या दोन जागांवर महाविकास आघाडीने वर्चस्व राखले होते. त्यामुळे चार जागांचे हे समिकरण प्रत्येकी 50 टक्क्यांवर राहिले होते. यावेळी महाविकास आघाडीने या चारही जागांवर सक्षम उमेदवार देताना मोठी ताकद पणाला लावली. परभणी व पाथरीत अनुक्रमे डॉ.राहूल पाटील व सुरेश वरपुडकर या दोन विद्यमानांना जागा दिली गेली.(Maharashtra assembly polls)
गंगाखेडमध्ये मागील वेळी निसटता पराभव स्विकारलेले विशाल कदम यांना उमेदवारी देताना खा.संजय जाधव यांनी आपले संपुर्ण लक्ष या मतदारसंघावर केंद्रीत केले होते. जिंतूरमध्ये माजी आ.विजय भांबळे यांचाही मागील वेळी केवळ 3 हजार 700 च्या फरकाने झालेला पराभव लक्षात घेवून तेच या मतदारसंघात विजय मिळवू शकतील, असा सर्वंकष राजकीय अंदाज घेवून त्यांना रिंगणात उतरविले गेले. मात्र परभणीत डॉ.पाटील हे महाविकास आघाडीच्या मुस्लिम प्राबल्याच्या मतांवर विजयी होण्यास यशस्वी ठरले.
गंगाखेड व जिंतूरमध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा पुन्हा एकदा काठावरच पराभव झाला. विद्यमानांमध्ये पाथरीची जागा वरपुडकर यांच्या रूपाने ताब्यात घेण्याचा मविआचा प्रयत्नही सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे डॉ.पाटील यांच्या रूपाने महाविकास आघाडी केवळ 25 टक्क्यांचीच कामगिरी जिल्हयात बजावू शकली.
याउलट महायूतीनेही उमेदवार देताना सर्वंकष सक्षमता लक्षात घेवून गंगाखेड, जिंतूर व पाथरीत समिकरणे मांडली. परभणीत शिवसेना शिंदे गटाला जागा देताना येथेही समिकरणे जुळविण्याचा प्रयत्न करीत भाजपमधून शिवसेनेत प्रवेश देवून आनंद भरोसे यांना रिंगणात उतरविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघात सभा घेवून भरोसेंना ताकद देण्याचा प्रयत्न केला. भरोसे ही पुर्वीच्या अनुभवाच्या आधारे अनेक समिकरणे जुळविण्यात काहीप्रमाणात यशस्वी ठरले मात्र जातींच्या समिकरणांतून त्यांच्या वाट्याला पराभव आला. महायुतीने केवळ हीच जागा गमावली. राज्यातील लाटेच्या तुलनेत या जागेवर देखील भरोसे यांनी घेतलेली हिंदुत्वाची मते लक्षवेधक ठरली. इतर तिन जागांवर मात्र महायूतीने यश मिळवित आपला टक्का 25 ने वाढविण्यात बाजी मारली.(Maharashtra assembly polls)