पर्वतीत पैसे वाटप; तर वडगाव शेरीत टिंगरेंवर हल्ला File Photo
Published on
:
20 Nov 2024, 9:48 am
Updated on
:
20 Nov 2024, 9:48 am
Pune News: मतदानाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांवर हल्ल्यांपासून पैसे वाटप असे विविध प्रकार घडल्याने चांगलाच गोंधळा उडाला. वडगाव शेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना दुपारी घडली. तर पर्वती मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडण्यात आल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
रेखा टिंगरे आणि पती चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश केला आहे. मंगळवारी दुपारी धानोरी जकातनाका परिसरात अज्ञातांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. टिंगरे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती परिमंडळ- 4 चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.
पर्वती मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप
पर्वती मतदारसंघातील काही भागांत भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचे चित्रीकरण केले. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना अटक करण्याची मागणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंगळवारी बिबवेवाडी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.
पोलीस आयुक्तांना निवेदन
टिंगरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत पदाधिका-यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. वंदना चव्हाण, अरविंद शिंदे, अंकुश काकडे, संजय मोरे, बापूसाहेब पठारे, अश्विनी कदम, रेखा टिंगरे या वेळी उपस्थित होते. मतदान संपेपर्यंत शहरातील सर्व मतदारसंघांतील बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी पधादिकाऱ्यांनी केली आहे.
हल्ल्यांच्या स्टंटबाजीचा फंडा
निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर ज्यांच्यावर हल्ले झाले त्याचा तपास तातडीने करून पोलिसांनी आरोपीला जेरबंद करावे. हल्ला स्वतःच घडून आणला असेल तर त्यांच्यावरसुद्धा तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता अॅड. रूपाली पाटील यांनी केली आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा स्टंटबाजी, हल्लेफंडा दिसून येतोय, रामकृष्ण हरी नौटंकी करते तुतारी, असा टोलाही त्यांनी लगाविला.