साकूर दरोड्याचा मास्टरमाईंड Pudhari
Published on
:
19 Nov 2024, 7:54 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:54 am
साकूर (ता. संगमनेर) येथील कान्हा ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली असून, अद्याप फरार असलेला पारनेर तालुक्यातील धोंड्या जाधव या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचे तपासात पुढे आले आहे.
साकूर दरोड्यानंतर पळून जाताना रस्ता चुकल्याने दाोन दरोडेखोर डोंगरात पळाले आणि गावकरी व पोलिसांच्या तावडीत सापडले. तेथूनच मुख्य आरोपीचे धागेदोरे मिळत गेले आणि आरोपी गजाआड झाले. मात्र प्रत्यक्षात लुटीसाठी न गेलेला धोंड्या महादू जाधव (रा. निघोज, ता. पारनेर) दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचे अटकेतील आरोपींनी सांगितले.
धोंड्याने सर्व आरोपींना एकत्र करून या दरोड्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी आरोपींनी दिवाळीच्या काळात मोटारीतून साकूर येथे येऊन कान्हा ज्वेलर्सची पाहणी केली. धोंड्यानेच वरील आरोपींच्या मदतीने दोन गावठी पिस्तुले व काडतुसे, गुन्ह्यात वापरलेल्या दोन महागड्या मोटारसायकली बारामती येथून चोरून आणल्या होत्या, हे तपासात उघड झाले आहे. दरोड्यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी अक्षय बाळू देवकर, मन्ना व अक्षय वावरे यांनी मोटारसायकलवर साकूर येथे जाऊन रस्त्यांची पाहणी करत रेकीही केल्याचे पुढे आले.
आरोपी धोंड्या जाधव हा प्रत्यक्षात दरोडा टाकायला आलाच नाही. त्याने अजय देवकर, अक्षय वावरे, मन्ना, स्वप्नील येळे व मनोज साठे यांना दोन महागड्या दुचाकींवरून पाठविले. तो मात्र आरोपींशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्कात होता. आरोपींनी सोमवारी (दि.11) दुपारी साकूर येथे जाऊन दरोडा टाकला. मन्ना ऊर्फ सूरसिंग याने दुकानादाराला पिस्तुलाचा धाक दाखविला. स्वप्नील येळे आणखी एका पिस्तुलासह दुकानाबाहेर होता. अक्षय देवकर व मनोज साठे याने दुकानातील दागिने पिशवीत भरले. दुकानातून जाताना मन्ना व स्वप्नीलने आपापल्या पिस्तुलांतून प्रत्येकी एक राऊंड फायर केला.
आरोपी पळून जाताना टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता चुकले आणि ढोकरी येथील डोंगरामध्ये पळून गेले. त्यांच्यापैकी अक्षय देवकर, मनोज साठे व मन्ना रात्रभर डोंगरामध्ये लपून सकाळी आळेफाटा ते नगर रस्त्यावर आले. त्यांनी धोंड्याला कॉल करून बोलावून घेतले. धोंड्या मोटारीने त्यांना मंचरला घेऊन गेला. त्या वेळी गुन्ह्यातील दागिने असलेली बॅग मनोज साठेकडे होती. मंचर येथे धोंड्याने काही दागिने मनोजला दिले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल व बॅगमधील काही सोन्याचे दागिने धोंड्या व उर्वरित दागिने मन्ना घेऊन गेला, अशी माहिती आरोपींकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.