Published on
:
23 Nov 2024, 1:27 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:27 pm
पालघर : आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरमध्ये महायुतीने मुसंडी मारली असून विक्रमगड, वसई, नालासोपारा, बोईसर आणि पालघर अशा पाच जागा जिंकल्या आहेत. मात्र बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून त्यांचा बालेकिल्ला ढासळला आहे. बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांचे अन्य दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण त्यांच्यावरच डाव उलटला आहे. अनपेक्षितपणे सीपीएमने मात्र आपला गड राखला आहे.
पालघर मुख्यालयात निवडणूकीच्या तोंडवर भाजपमधून शिंदे शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावीत यांनी मोठे यश मिळवले असून जवळपास 40 हजारांच्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 1 लाख 12 हजार 894 मते मिळाली तर त्यांचेच प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा 72 हजार 557 तर मनसेच्या कोरडा यांना 10 हजार मते मिळाली. त्यामुळे बॅकफुटवर गेलेले गावीत पुन्हा एकदा फ्रंट फूटला आले आहेत.
दुसर्या बाजुला डहाणूचा गड माकपने राखला असून विनोद निकोले यांना 1 लाख 4 हजार 702 तर भाजपचे विनोद मेढा यांना 99 हजार 559 मते मिळाली. विनोद निकोले यांनी आपला गड राखला आहे.
विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचा गड ढासळला आहे. येथे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना पराभवाचा धक्का बसला. हरिश्चंद्र भोये हे 1 लाख 14 हजार 514 मते घेत विजयी झाले आहेत. त्यांना सुनील भुसारा यांच्यापेक्षा 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. भुसारा यांना 72 हजार 482 मते मिळाली. तर जि.प.चे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांना 32 हजार मते मिळाली.
वसईमध्ये अनपेक्षितपणे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या नवख्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांना 77 हजार 279 मते मिळाली. काँग्रेसचे विजय पाटील यांना 61 हजार 874 मते मिळाली. लोकसभेला निकाल विरोधात जावूनही महाविकास आघाडीबरोबर न जाण्याचा निर्णय बहुजन विकास आघाडीला गोत्यात आणण्याचा ठरला. तर महायुतीचा उमेदवार देण्याचा निर्णय फळाला आला आहे. हितेंद्र ठाकूर यांना 74 हजार 4 मते मिळाली आहे. बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या वसई मतदार संघात बविआचा पराभव झाला आहे.
मतदानाच्या आधी एक दिवस नालासोपारा मतदार संघ चर्चेत आला तो पैसे वाटपाच्या मुद्द्यावरुन. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बविआने केला होता. विनोद तावडे यांच्यासह भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. परंतू राजन नाईक यांना नालासोपारा मतदार संघातून चांगले मताधिक्य मिळाले असून त्यांना 1 लाख 64 हजार 243 मते मिळाली आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचे पूत्र विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला असून त्यांना 1 लाख 27 हजार 238 मते मिळाली आहेत.
बोईसर विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांनी बाजी मारली असून त्यांना 1 लाख 26 हजार 117 मते मिळाली आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 81 हजार 662 मते मिळाली आहेत.