नगर-मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुली या ठिकाणी अर्धवट फ्लायओव्हरच्या चारही बाजुंनी अनेक मोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून चार जण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने कालही ऊस वाहतूक ट्रॅक्टर या खड्ड्यात अडकल्याने वाहनाचे नुकसान झालेच, मात्र वाहतूकही ठप्प झाल्याने प्रवाशांनी प्रशासनासह ठेकेदारावरही तोंडसुख घेतल्याचे दिसले.
पुणतांबा चौफुलीच्या अर्धवट फ्लायओव्हरचे ज्या ठेकेदाराने काम हाती घेतले, त्याने ते वेळेत पूर्ण न केल्याने आज या ठिकाणी प्रवाशांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. महिन्यात या ठिकाणी अनेक अपघात झाले. आतापर्यंत या अपघातांमध्ये 15 ते 20 जण जखमी झाले असून चार जण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. निवडणुकीच्या धामधुमीत या रखडलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी वा प्रशासनाचे लक्ष नसल्याने याचा वाहनधारकांना मात्र त्रास होत आहे.
पुणतांबा चौफुली या ठिकाणाहून नगर-मनमाड हा महामार्ग जातो. या रस्त्याने प्रचंड वाहतूक असते. पुणतांब्याहुन तसेच झगडेफाटयाकडून येणार्या वाहनांना ही चौफुली ओलांडतांना अतिशय कसरत करत जावे-यावे लागते. या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे तर पडलेच आहेत. गेल्या आठवड्यापासून नजिकचे सायफनही फुटल्यामुळे रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. या साचलेल्या पाण्यात खड्डयांचा अंदाज न आल्याने अनेक वाहनांना अपघात होत आहेत. त्यामुळे सातत्याने मोठाले अपघात होताना दिसत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी असेच मोठे वाहन या खड्डयांमध्ये अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या मार्गस्थ करण्यासाठी पोलिस यंत्रणा जागेवर नव्हती. त्यामुळे अनेक वाहनधारकांनी यावेळी संताप व्यक्त केला. मुळातच, या चौफुलीवर फलायओव्हरचे अर्धवट काम उभे राहिले आहे. त्यामुळे येणार्या जाणार्या वाहनांना शिस्त राहिली नाही. ज्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम हाती घेतले, त्याने ते वेळेत पूर्ण न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अण्णा जगताप यांनी ही बाब प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली. परंतु विधानसभेच्या निवडणुका असल्याने या समस्येकडे बघण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याचे जगताप यांनी सांगितले. संबंधित ठेकेदाराने रस्ता करण्यापूर्वी किमान खड्डे तरी बुजवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.