Published on
:
23 Nov 2024, 9:03 am
Updated on
:
23 Nov 2024, 9:03 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली, ज्येष्ठ नेते शरद पवार ज्या ज्या मतदारसंघात सभा घेत होते, तेथील वातावरण बदलत होते. लोकसभा निवडणुकांचा निकालही भाजप प्रणित महायुतीला धक्का देणारा ठरला. भाजपच्या या पराभवात शरद पवार हा फॅक्टर सर्वांत महत्त्वाचा ठरला; पण आज (दि.२३) विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेला निकाल हा शरद पवारांसाठी फार मोठा सेटबॅक ठरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुमारे १० ते १२ जागा मिळतील, असा कल आहे. शरद पवारांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा पराभव ठरला आहे.
सहा दशकांमधील राजकीय कारकीर्दीतील सर्वात लो पॉईंट
आज देशातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते अशी शरद पवार यांची ओळख आहे. तब्बल सहा दशकांचा त्यांच्या राजकीय कारकीर्द ही नेहमीच राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय ठरली. १९५८ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. १९६७ ला त्यांनी बारामती विधानसभेची निवडणूक जिंकली. १९७८ ला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. १९८८ला त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. १९९० मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने शरद पवारांसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते;पण पवारांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवत सलग तिसर्यांदा मुख्यमंत्री होण्याचाही बहुमान मिळवला. १९९१ला ते देशाचे संरक्षणमंत्री झाले;पण तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार १९९३मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा शरद पवारांकडेच आली.
स्वतंत्र पक्ष आणि पुन्हा सत्तेचे वाटेकरी...
वर्ष होतं १९९९. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत १० जून १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यांना पी.ए. संगमा आणि तारीक अन्वर यांचीही साथ मिळाली. विशेष म्हणजे १९९९ विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. अशा परिस्थितीतही त्यांनी राज्यात २३३ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती. शरद पवार सर्वेसर्वा असणारा पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ५८ जागा जिंकल्या होत्या. निवडणूक स्वतंत्र लढवली असली तरी निकालानंतर शरद पवारांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत सत्तेत आपला सहभाग कायम ठेवला. यानंतर २००४ आणि २००९ मध्ये अनुक्रमे ७१ आणि ६२ मतदारसंघांमधील आपलं वर्चस्व कायम ठेवले. महाराष्ट्रात १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिली. २०१९ मध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी सत्तास्थापनेची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी भाजपसोबत जात २३ नोव्हेंबर २०१९ला सरकार स्थापन केले होते. पुढे अजित पवार माघारी फिरले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. पुन्हा सलग अडीच वर्ष राष्ट्रवादी सत्तेत राहिले.
शरद पवारांच्या राजकारणातील सर्वात लो पॉईंट
देशातील दिग्गज नेते आणि मराठा स्ट्राँगमॅन अशी ओळख असलेल्या शरद पवारांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक ही त्यांच्या राजकारणातील सर्वांत लो पॉईंट ठरला आहे. . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले, असे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होतो. विशेषतः शरद पवारांची आंबेगाव येथील फार गाजली होती. शरद पवारांच्या साताऱ्यातील गाजलेल्या भरपावसातील सभेची हा सभेशी तुलना केली जात होती. पण हे वातावरण मतदानात बदलू शकले नाही, हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.
बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरणच जमलेले आहे; पण या विधानसभा निवडणुकीत हे समीकरणही मोडून पडले. १९९१पासून बारामतीचे प्रतिनिधित्व करतात. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा मोठा पराभव झाला; पण आजच्या विधानसभा निवडणुकीत मात्र शरद पवार यांचा नातू युगेंद्र पवार यांचा अजित पवारांनी पराभव केला. एकीकडे शरद पवारांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपले यश कायम ठेवले आहे. तब्बल ३९ मतदारसंघांमध्ये निर्णायक आघाडी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एक प्रकारे हा पराभव शरद पवारांचाच मानला जात आहे. त्यामुळे बारामतीत 'साहेबांचा' हा पहिलाच पराभव ठरला आहे तसेच राजकीय कारकीर्दीतीलही सर्वात मोठा सेटबॅक ठरला आहे.