पूर्णा येथील शासकीय हमीदर केंद्रावर २ लाख ६५ हजार क्विंंटल सोयाबीनची खरेदी झाली.Pudhari News
Published on
:
29 Nov 2024, 12:51 pm
Updated on
:
29 Nov 2024, 12:51 pm
पूर्णा: पूर्णा तालुका खरेदी विक्री संघात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राला परवानगी दिली आहे. येथे शासकीय हमीदरानुसार ऑनलाइन ऑफलाइन पध्दतीने नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली जाते. प्रति क्विंटल ४ हजार ८९२ रुपये प्रमाणे केंद्र सरकारच्या हमीदरात आजतागायत एकूण २ लाख ६५ हजार ७.५० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना संदेश पाठवले असून अद्याप खरेदीचे काम सुरूच आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी ऑफलाइन पध्दतीने केंद्रावर सरकारच्या एमएसपी हमीदरात सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी करत आहेत. १५ डिसेंबर रोजी नोंदणीची शेवटची तारीख आहे. खरेदी पूर्वी अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घेतली आहे. मागच्या काही दिवसांपासून मार्केट कमिटी अथवा खुल्या बाजारात डीओसीचा उठाव होत नसल्यामुळे सोयाबीनचे दर गडगडून ते प्रति क्विंटल ४१०० ते ४२०० रुपयावर आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती मशागतीसह उत्पादन खर्चही निघत नाही. तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
येथील शासकीय हमीदर केंद्रावर आजपर्यंत १८७ नोंदणीकृत शेतकऱ्यांचे २ लाख ६५ हजार ७.५० क्विंटल सोयाबीन प्रति क्विंटल ४८९२ हमीदरा प्रमाणे खरेदी करण्यात आले आहे. त्यापैकी १५१ शेतकऱ्यांच्या २१६४.५० क्विंटल सोयाबीनचे पेमेंट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती संदीप घाटोळ यांनी 'दै.पुढारी'शी बोलताना दिली.
यापुढे देखील नोंदणी केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचे स्वच्छ असलेले सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी केलेल्या सोयाबीनचे चुकारे पंधरा दिवसांनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस पध्दतीने जमा केले जात आहेत.
पूर्णा तालुका खरेदी विक्री संघाअंतर्गत आम्ही सबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हरबरा व सोयाबीनसाठी शासकीय हमीदर खरेदी केंद्र सुरू करून घेतले आहे. यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सहकार्याने शासकीय हमीदर केंद्र अविरत सुरू ठेवणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यास मदत होणार आहे.
बापूराव घाटोळ, चेअरमन, पूर्णा तालुका खरेदी विक्री संघ