निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार File Photo
Published on
:
17 Nov 2024, 6:58 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:58 am
विधानसभेचा प्रचार संपण्यास दोनच दिवस शिल्ल्क राहिल्याने सर्वत्र प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. कोथरूडमधील उमेदवारांचा भर मॉर्निंग वॉक, सोसायट्या, घरे आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी आणि पदयात्रांच्याच माध्यमातून प्रचार करण्यावरच आहे. या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशिवाय इतर कोणत्याही नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. या निवडणुकीत विजय मिळवायचाच, असा निर्धार महाविकास आघाडी आणि मनसेकडून व्यक्त केला जात असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मात्र किमान एक लाखाच्या फरकाने निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे
कोथरूड हा बाणेर, सूस, म्हाळुंगे, पाषाण, बावधन बु., जय भवानीनगर, केळेवाडी, कोथरूड गावठाण, शिवतीर्थनगर, भुसारी कॉलनी, बावधन खु., आयडियल कॉलनी, महात्मा सोसायटी, कर्वेनगर अशा उच्चभू, मध्यम आणि झोपडपट्यांचा समावेश असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मागील काही निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीकडून दुसरीकडे महाविकास आघाडीचे मोकाटे आणि मनसेचे अॅड. शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारास सुरुवात केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा सोडली, तर या मतदारसंघात दुसऱ्या कोणत्याही नेत्याची सभा किंवा रोडशो झालेला नाही.
विद्यमान आमदार व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेकडून माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे यांच्यासह एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचा विचार करता विधानसभा उमेदवारीच्या शर्यतीत असणाऱ्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेवर घेण्यात आले, तर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेला संधी देऊन खासदार केले. त्यामुळे कोथरूडमधून भाजप पुन्हा विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी देणार, हे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर पाटील यांनी गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती.
उमेदवारी अर्ज भरल्यापासून तीनही उमेदवारांनी मॉर्निंग वॉक, उद्यानात जाणाऱ्या नागरिकांसह सोसायट्या, वस्त्या, प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी आणि पदयात्रांच्याच माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळते.
महाविकास आघाडी आणि मनसेकडून प्रत्येकी एक एक रॅली काढण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीचे चंद्रकांत पाटील मात्र मागील काही दिवसांपासून सकाळी पदयात्रा, दुपारी गाठीभेटी आणि सायंकाळी रॅली, असा प्रचार करत आहेत. इतर उमेदवारांच्या तुलनेत महायुतीने प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महायुतीमधील घटकपक्षांच्या नेत्यांचा आणि कार्यकत्यांचाही समावेश चांगल्या प्रकारे प्रचारात पाहायला मिळतो. महाविकास आघाडी आणि मनसेचे उमेदवार या निवडणुकीत आपणच बाजी मारणार, असा दावा करत आहेत. तर, गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर आपला विजय निश्चित असून, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले ७१ हजारांचे मताधिक्य वाढवून ते एक लाखाच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत.
शेवटी कोथरूडकर विद्यमान आमदाराच्या पारड्यात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य टाकणार की महाविकास आघाडीला किंवा मनसेला संधी देणार, हे सर्व मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दिवसभर व्यक्तिगत गाठीभेटी, सायंकाळी एखादी प्रचार फेरी, या माध्यमातून प्रचार केला जात आहे. मागील पाच वर्षांत चांदणी चौक उड्डाणपूल, मेट्रो, बाणेर, पाषाण- सूस या भागासाठी समान पाणीपुरवठा योजना, फिरते दवाखाने आदी कामे केली आहेत. भविष्यात मतदारसंघात सिमेंटचे रस्ते, पावसाळी वाहिन्या टाकणे, दिशा बदललेले व अतिक्रमण झालेले नाले दुरुस्त करणे, नाल्यांना सीमाभित बाधणे, सूस-बाणेर- बावधन भागाक सुसज्ज सभागृह बांधणे, पाषाण तलावाचे सुशोभीकरण करणे आदी कामे करण्याचे नियोजन केले आहे.
चंद्रकांत पाटील, उमेदवार, महायुती
कोथरूडचा आमदार असताना मी जी कामे केली, ती कोथरूडकरांच्या समोर आहेत. त्यामुळे कोथरूडकर मला या वेळी विजयी करतील. निवडून आल्यानंतर बालेवाडी येथे ८०० खाटांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रुग्णालय उभारणे, कोथरूड, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, कर्वेनगर, पौड रस्ता परिसरात खुल्या मैदानाची उभारणी करणे, मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील अविकसित रस्ते (मिसिंग लिंक) विकसित करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवणार, मेट्रोचे जाळे विस्तारणे, यावर मी काम करणार आहे.
चंद्रकांत मोकाटे, उमेदवार, महाविकास आघाडी
जनता महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींना कंटाळली आहे. त्यामुळे कोथरूडकर या निवडणुकीत मनसेला निवडून देतील. निवडून आल्यानंतर मतदारसंघातील वाहतूक कोंडी, तसेच कचरा व पाण्याचा प्रश्न सोडविणे, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासोबतच मैदानासाठी आरक्षित जागांवर मैदाने विकसित करणे, आदी कामांवर भर देणार आहे. तसेच मतदारसंघातील टेकड्या वाचल्या पाहिजेत, यासाठी पंचवटी ते कोथरूड बोगदा आणि बालभारती ते पौड फाटा यादरम्यानच्या नियोजित रस्त्याला आमचा विरोध राहील.
अॅड. किशोर शिंदे, उमेदवार, मनसे