यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकही सभा रायगडमध्ये झाली नाही file
Published on
:
19 Nov 2024, 6:19 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:19 am
अलिबाग : गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या रायगडातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा सोमवारी थंडावल्या. आरोप, प्रत्यारोप करतानाच विकासावरही भाष्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्यांना मोठे केले, सर्व काही सत्तेची पदे दिली, ज्यांनी गद्दारी केली, अशा गद्दारांना धडा शिकवावा,असे आवाहन खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देत प्रचारात रंगत आणली.
रायगडमधील सातही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होत असला तरी पनवेल, पेण, कर्जत,उरणमध्ये मविआचे घटक पक्ष असलेले शेकाप, शिवसेना (ठाकरे) हे परस्परांच्या विरोधात उतरल्याने या तिन्ही मतदारसंघात काय निकाल लागतोय याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले पनवेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची उरण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोहपाडा येथे जाहीरसभा घेत महायुतीच्या प्रचाराची खिंड लढविली तर महाआघाडीतर्फे शरद पवार यांची म्हसळा, उद्धव ठाकरे यांची कर्जत,खा.संजय राऊत यांची उरणला तर शिवसेना नेते नितीन बानुगडे यांच्याच सभा झाल्या.
मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी रायगडात नेहमी प्रचारासाठी येणारे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या सभा वा प्रचारदौरे यावेळी जिल्ह्यात कुठेच झालेच नाहीत. भाजपनेही फडणवीस वगळता राज्यस्तरीय नेत्यांना रायगडात तसे पाचारणही केले नाही. रायगडची जबाबदारी गोवा भाजपकडे देण्यात आली आहे. या राज्यातील मुख्यमंत्री प्रमोद नाईक यांच्यासह अन्य नेते रायगडवर नजर ठेऊन आहेत. बुथस्तरावर त्यांचा जोरदार प्रचारही सुरू आहे.पण ही मंडळी कधीही जाहीरसभांमधून दिसून आली नाहीत हे विशेष म्हणावे लागेल.
एकनाथ शिंदे, अजित पवारांची सभाच नाही
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकही सभा रायगडमध्ये झाली नाही हे विशेष. नाहीतर आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये या नेत्यांच्या सभा जिल्ह्यात होत असत.यावेळी महाडमध्ये निदान आ.भरत गोगावले यांच्यासाठी आणि श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभा घेतील,असे अपेक्षित होते.खा.सुनील तटकरे यांनीही श्रीवर्धन, महाड, अलिबाग संघात महायुतीचे उमेदवार आदिती तटकरे, आ.भरत गोगावले, आ.महेंद्र दळवी यांच्यासाठी सभांचा धडाकाच लावला.मात्र त्यांनी यावेळी कर्जतमध्ये सभा घेण्याचे टाळले.
रायगडमध्ये शेकापचे चार उमेदवार आहेत. या चारही मतदारसंघात शेकापने जाहीर सभांऐवजी कॉर्नरसभा,गाव सभांवर भर देत मतदारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी शेकापतर्फे माजी आ.जयंत पाटील हे एकटेच चारही मतदारसंघात प्रचाराची खिंड लढवित असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. पक्षातील दुसर्या फळीतील बोलणारे नेतेच यावेळी अभावाने दिसत होते.त्याची जाणीवही प्रचारात प्रकर्षाने दिसून आली.पक्षाचे जे फर्डे वक्ते आहेत त्यापैकी धैर्यशील पाटील हे सध्या भाजपत आहेत.तर माजी आ.पंडित पाटील हे निवडणुकीतून अलिप्त राहिले.