Published on
:
23 Nov 2024, 4:21 pm
Updated on
:
23 Nov 2024, 4:21 pm
नागपूर : प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे वाटते की आपल्याच पक्षाचा नेताच मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण आपले महायुती सरकार आहे. आपण एकत्रित आहोत. एकत्रितपणे आपण जिंकलेलो आहोत. सगळ्यांनी मिळून बसूनच हा निर्णय करायचा आहे असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भाजप, महायुतीच्या जोरदार विजयानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन झाले. जल्लोषात विमानतळावर स्वागत झाले. फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रातील जनतेने विशेषता विदर्भाने आणि नागपूर जिल्ह्याने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला. काही लोक सांगत होते आमचे विदर्भात, नागपुरात पाणीपत होणार, मात्र त्यांचेच पाणीपत झाले. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला.
मी महाराष्ट्रातील जनतेसोबतच माझ्या कर्मभूमीचे नागपूर आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो. मुख्यमंत्री कोण होणार हे तीन पक्ष मिळून लवकरच ठरवतील. ते ज्याला ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल. विरोधकांनी ज्या प्रकारे आम्हाला टार्गेट केले . व्यक्तीगत मला लक्ष्य केले. माझ्या परिवाराला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला , आमच्या महायुतीला केले. ज्या प्रकारे हे टार्गेट त्यांनी केले.
माझे मत आहे की जनतेने त्याचे उत्तर दिले आहे. अशा प्रकारचं टार्गेट करणं हे जनतेला आवडत नाही हे सिद्ध झाले. संजय राऊत यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला त्याबाबत छेडले असता मी त्याच्यावर कधीच उत्तर देत नाही. कारण आमचे प्रसाद लाड म्हणाले की, काही लोक गांजा पिऊन बोलतात. मी तसे काही म्हणणार नाही. भाजपच्या यशात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पायाला भिंगरी लावून ते पूर्ण महाराष्ट्र फिरले. संघटन उभे केले. प्रसंगी चार शिव्या खाल्ल्या. दरम्यान, वर्षा बंगल्यावर कधी जाणार याकडे लक्ष वेधले असता मी आज दुपारीच गेलो, सागर आणि वर्षा बंगला फार अंतर नाही असेही फडणवीस म्हणाले.