फलटण : फलटण कोरेगाव राखीव मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर असले तरी खर्या अर्थाने राजे गट व माजी खासदार गटातच टस्सल होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सचिन पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आ. दिपक चव्हाण रिंगणात उतरले आहेत. प्रचार काळात झालेल्या आरोप -प्रत्यारोपाने येथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आज होत असलेल्या मतदानात फलटणची जनता कोणाला कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुरंगी लढतीच्या टक्करीमध्ये आणखी काही पक्षांनी व अपक्षांनी शड्डू ठोकल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
फलटण-कोरेगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील, रासपचे दिगंबर आगवणे, स्वाभिमानी पक्षाचे प्रा. रमेश आढाव, वंचित बहुजन आघाडीचे सचिन भिसे, बसपचे प्रतिभाताई शेलार, सनय छत्रपती शासन पक्षाचे दीपक चव्हाण, अमोल करडे, कांचन कन्होजा खरात, कृष्णा यादव, गणेश वाघमारे, चंद्रकांत भालेराव, नितीन लोंढे, सूर्यकांत शिंदे हे सर्वजण आपले नशीब आजमावत असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दीपक चव्हाण राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
आ. दीपक चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसांत तीन सभा घेवून वातावरण चांगलेच तापवले आहे. तर चव्हाण यांच्यासाठी खा. शरद पवार, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सभा घेवून हल्लाबोल केला. या आरोप -प्रत्यारोपाच्या फैरींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघात राजे गट विरुद्ध माजी खासदार गट या पारंपरिक लढतीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.