बड्या लोकांचे आणि राजकीय पदावर असणाऱ्या नेत्यांचे मुजोरीचे अनेक व्हिडिओ समोर येतात. पुण्यात आणि संभाजीनगर मध्ये तसेच दोन व्हिडिओ समोर आलेले आहेत. आज कोणी जमीन मालकाला बेदम मारहाण करतोय तर कुठे एक बिल्डर भर चौकात पोलिसांनाच दम देतोय.
कुठे अजित पवार यांचा निकटवर्तीय आणि पुण्यातला माजी नगरसेवक जमीन मालकाला दमदाटी करून आपटतोय. तर कुठे एक बडा व्यापारी संभाजीनगरच्या पोलिसांवर आपल्या मुजोरपणाचा रूबाब झाडतोय. एका व्यक्तीला मानेवर पकडून जमिनीवर आपटणारी ही व्यक्ती अजित पवार गटाची नगरसेवक आहे. इतकंच नाही तर पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदही या व्यक्तीने भूषवलंय. बाबुराव चांदोरे असं नाव असलेले हे इसम अजित पवार यांचे निकटवर्तीही मानले जातात. माहितीनुसार, बावधन मधल्या एका जमिनीवर बिल्डर विजय रौंदळ यांचं काम सुरू होतं. त्यांच्या जागेवर चांदोरे यांनी जेसीबी लावून काम सुरू केलं. आणि त्यावर आधी रौंदळ यांच्याकडून प्रशांत जाधव नावाच्या व्यक्तीला आणि त्यानंतर जाब विचारायला आलेल्या विजय रौंदळ यांनाही बाबुराव चांदोरे यांनी मारहाण केली. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर रौंदळ यांच्या डोक्याला मार लागल्याने ते रुग्णालयात आहेत. तर चांदोरे यांनी या आधी सुद्धा एका रिक्षा चालकाला मारहाण केली होती. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवार आपल्या माजी नगरसेवकावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये राजकीय नेत्यांचा जवळचा असणाऱ्या कुणाल बाकलीवाल या नावाच्या बिल्डरनं पोलिसांवर दमदाटी करून तुम्हाला दोन तासात सस्पेंड करतो मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का? अशा शब्दात धमक्या दिल्या. त्याचा दमदाटीचा व्हिडिओ पोलीस शूट करत असूनही त्याच्या चेहऱ्यावरचा मुजोरपणा कमी झालेला नव्हता. अलीशान गाडीतून सायरन वाजवत जात असताना पोलिसांनी त्याला रोखलं होतं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Published on: Jan 27, 2025 11:02 AM