Published on
:
19 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:35 pm
सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी कायमस्वरूपी वेळापत्रक ठरले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची आता ऑनलाईन बदल्या होणार असल्याने बदलीतील वशिलेबाजीला लगाम बसणार आहे. राज्यातील शिक्षकांचे दरवर्षी लांबणारे बदल्यांचे गुर्हाळ आता बंद होणार आहे. यापुढे एकाच वेळापत्रकानुसार संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आहेत. 31 मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
बदली प्रक्रियेत एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे कार्यासन अधिकारी नितीन पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शासनाची दिशाभूल करणे शिक्षकांना महागात पडणार आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवरील 25 ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यान्वित असावे, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, 1 ते 31 मार्च दरम्यान उपलब्ध रिक्त पदे निश्चित करणे, 1 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सीस कंपनीस उपलब्ध करून देणे, 21 ते 27 एप्रिल दरम्यान समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे, 28 एप्रिल ते 9 मे दरम्यान शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, 10 ते 21 मे दरम्यान बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, 22 ते 27 मे दरम्यान विस्थापीत शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे व 28 मे ते 31 मे दरम्यान अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे असा वेळापत्रक आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बरोबर आता जिल्हांतर्गत बदल्याही कायमस्वरूपी ऑनलाईन झाल्यामुळे बदल्या पारदर्शक पद्धतीने होणार आहेत. बदलीतील वशिलेबाजी थांबणार आहे. बदलीस पात्र असणार्या शिक्षकांना न्याय मिळणार आहे.
नीलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना