Published on
:
29 Nov 2024, 6:51 am
Updated on
:
29 Nov 2024, 6:51 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम एजाज खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. कधी तो आपलं मत खुलेपणाने व्यक्तव्य करताना तर कधी त्याच्या ड्रग्जच्या प्रकरणामुळे. आता त्याची पत्नी फॉलन गुलीवाला ड्रग्ज प्रकरणात अडकली आहे. सीमा शुल्क विभागाने एजाजची पत्नीच्या घरावर छापा टाकला. आणि यामध्ये त्यांना ड्रग्ज सापडले आहे. यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.
काल एजाज खानची पत्नी फॉलन गुलीवालाच्या जागेश्वर येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत. या घटनेनंतर फॉलन हिला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
८ ऑक्टोबर २०२४ रोजी एजाज खानचे नाव ड्रग्ज तस्करी प्रकरणात समोर आले होते. एजाज खानचा शिपाई सूरज गौर याच्याकडून कुरिअरद्वारे १०० ग्रॅम मेफेड्रोन किंवा एमजीएमए ऑर्डर केल्याचा आरोप लावला होता. कुरिअरद्वारे येणाऱ्या ड्रग्जच्या पकिटावर एजाज खानच्या ऑफिसचा पत्ता होता. यावरून पोलिसांनी एजाजवर लक्ष ठेवले होते. याच दरम्यान त्याच्या पत्नीच्या घरावर छापा टाकला.
हे ड्रग्ज B-207, ओबेरॉय चेंबर्स, अंधेरीतील वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट येथे पोहोचवली जाणार होती, हा एजाजच्या कार्यालयाचा पत्ता आहे. सूरज गौर विरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर एजाज खान बेपत्ता आहे. पोलिस जबाब नोंदवण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत.
एजाज खानला याआधी २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. NCB ने त्याला ४.५ ग्रॅम वजनाच्या अल्प्राझोलमच्या ३१२ गोळ्यांसह ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. सुमारे २६ महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची सुटका झाली होती.