Published on
:
23 Nov 2024, 1:50 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:50 pm
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: विधानसभेच्या मेहकर अ.जा.आरक्षित मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व सलग तीन टर्म आमदार राहिलेले डॉ.संजय रायमूलकर यांचा अगदीच नवखे उमेदवार सिध्दार्थ खरात यांच्याकडून ५२१९मतांनी झालेला पराभव हा रायमुलकर यांच्यासाठी जबर धक्का असला तरी त्याहून अधिक धक्का हा रायमुलकरांचे गॉडफादर तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.जाधव हे मेहकर मतदारसंघातून सलग तीनवेळा शिवसेनेच्या चिन्हावर निवडून गेले होते.परंतू २००९ मध्ये परिसिमन आयोगानुसार,मेहकर विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर जाधव यांनी लोकसभेचा मार्ग पत्करला व तेव्हापासून सलग चौथ्या वेळी ते लोकसभेवर निवडून गेलेले आहेत.
दरम्यान,सामान्य शिवसेना कार्यकर्ता असलेल्या मानसपुत्र संजय रायमुलकरांना राजकीय पाठबळ देऊन प्रतापराव जाधव यांनी तीन वेळा विधानसभेवर निवडून पाठवले होते.रायमुलकर यांना आता चौथ्या वेळी निवडून आणणे हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिष्ठेचा विषय करून जोरदार मोर्चेबांधणी केली होती.मेहकर हा जाधवांचा गृह मतदारसंघ असल्याने व पक्षाने केंद्रीय राज्यमंत्री पद दिले असल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांना निवडून आणण्यासाठी जाधवांनी सर्वपरिने प्रयत्न करूनही रायमुलकर यांना एका अराजकीय व्यक्तींकडून पराभव पाहावा लागला.रायमुलकरांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उ.बा.ठा.पक्षाचे सिध्दार्थ खरात यांनी निवडणूकीपुर्वी गृह विभागाच्या सहसचिव पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेऊन उमेदवारी पटकावली.प्रशासनातील अनुभव परंतू राजकीय पिंड नसलेल्या खरात यांनी तीन वेळा आमदार राहिलेल्या संजय रायमुलकरांपुढे आव्हान उभे केले असूनही शिवसेना शिंदे गटाने म्हणजेच जाधव -रायमूलकर यांनी खरात यांच्या उमेदवारीकडे गांभिर्याने पाहिले नाही.
जाधव-रायमुलकरांचा बडेजाव हा मतदारसंघाबाहेरून आलेल्या खरातांची विजयरथ रोखू शकला नाही.सामान्य मतदारांनी आमदार रायमुलकर यांच्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही इशारा दिला आहे.रायमुलकर यांचा अनपेक्षित पराभव हा मंत्री जाधवांच्या जिव्हारी लागला आहे.