बुलढाण्यात महायुतीचे ६ उमेदवार विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:55 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:55 am
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. महायुती व आघाडीचे जिल्ह्यातील संख्याबळ आहे तेवढेच कायम राहिले आहे. मावळत्या विधानसभेतही महायुतीचे ६ आमदार होते. त्यात भाजपाचे ३ शिवसेना शिंदे गटाचे २ तर राष्ट्रवादीचे १ आमदार होते.
तर, काँग्रेसचे एक आमदार होते. नव्या विधानसभेत भाजपचे ४ तर शिवसेना शिंदे गट १, राष्ट्रवादी अजित पवार गट १ व शिवसेना ठाकरे गटाचे १ असे आमदारांचे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आली नाही. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९०,४५७ मते मिळवून शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांचा १ हजार ४७३ मतांनी पराभव केला. शेळके यांना ८८ हजार ९८४ मते मिळाली.
मलकापूर मतदारसंघात भाजपाचे चैनसुख संचेती यांनी १,०९९२१ मते मिळवून काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांना २६ हजार ३९७ मतांनी पराभूत केले. एकडे यांना ८३,५२४मते मिळाली. चिखली मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांनी १ लाख ७७०३ मते मिळवून काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांचा ३१८२ मतांनी पराभव केला . बोंद्रे यांना १०४५२१ मते मिळाली.
सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायदे यांनी ७२ हजार २४६ मते मिळवून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा ४९५२ मतांनी पराभव केला. पाचवेळा आमदार राहिलेले शिंगणे हे मनोज कायदे या नवख्या उमेदवाराकडून पराभूत झाले. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांना तिस-या क्रमांकाची ५९ हजार ८४७ मते मिळाली.
मेहकर अ.जा.आरक्षित मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे नवखे उमेदवार सिध्दार्थ खरात यांनी सलग तीन टर्म आमदार राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांचा ५२१९ मतांनी पराभव केला. खरात यांना १,०२९४४ मते, तर रायमूलकर यांना ९७ हजार ७२५ मते मिळाली. खामगाव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आकाश फुंडकर हे १,०८९४६ मते मिळवून तिस-या वेळी विजयी झाले आहेत. फुंडकर यांनी २५ हजार २३२ मतांनी सानंदा यांचा पराभव केला.
जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे हे १०७३२८ मते मिळवून पाचव्यांदा विजयी झाले आहेत. कुटे यांनी काँग्रेसच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांचा १८ हजार ७७१ मतांनी पराभव केला. वाकेकर यांना ८८ हजार ५४७ मते मिळाली.