Published on
:
19 Nov 2024, 1:17 pm
Updated on
:
19 Nov 2024, 1:17 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border-Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू होण्यास फार कमी वेळ शिल्लक आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा स्वतःचा विशेष दबदबा आहे, जी सर्वात मोठी कसोटी मालिका मानली जाते. जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा एकीकडे विराट कोहली-स्टीव्ह स्मिथ, जसप्रीत बुमराह-मिचेल स्टार्क यांच्यात स्पर्धा रंगेल, तर दुसरीकडे भारताचा रविचंद्रन अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायनही आमनेसामने येणार आहेत. या दिग्गज फिरकीपटूंची आकडेवारी जाणून घेऊया.
अश्विन आणि लायन हे बीजीटीमध्ये सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरले आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही दिग्गजांमध्ये विकेट घेण्याची जबरदस्त शर्यत रंगते. दोन्ही गोलंदाजांनी कसोटी कारकिर्दीची सुरुवात एकत्र केली.
लायनच्या नावावर सर्वाधिक विकेट्स
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्यात लायन आघाडीवर आहे. या कांगारू गोलंदाजाने 2011 मध्ये पदार्पण केल्यापासून भारताविरुद्ध एकूण 26 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 32.40 च्या सरासरीने 116 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान, त्याने 9 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी 50 धावांत 8 बळी अशी राहिली आहे.
भारताचा फिरकीपटू आर अश्विननेही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने 2011 पासून बीजीटीमध्ये एकूण 22 कसोटी सामने खेळले असून 28.36 च्या सरासरीने 114 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यात आणि लायनमध्ये केवळ 2 विकेट्सचा फरक आहे. त्याने 7 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याची किमया केली आहे. 103 धावांत 7 बळी ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे.