Published on
:
20 Nov 2024, 12:09 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:09 am
बंगळूर : गारमेंट कारखाना, इमारत बांधकामासह विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठी वैद्यकीय सुविधा देणार्या एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स (इएसआय) व्यवस्थेवर आता भामट्यांची नजर पडली आहे. बोगस कंपन्यांची नोंद करून सुमारे 900 जणांना इएसआय सुविधांचा लाभ अनेकांना मिळवून देण्यात आला आहे. याद्वारे सरकारची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.
ईएसआय अंतर्गत कर्मचार्यांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतात. बंगळुरात बोगस इएसआय कार्ड देणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या प्रकरणी इएसआय रुग्णालयाचा सिक्युरिटी गार्ड श्रीधर, रमेश शिवगंगा, श्वेता, ऑडिटर शशिकला अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पहचान कार्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य, सील, विविध रुग्णालयांतील डॉक्टरांचे सील, 4 लॅपटॉप, 59,500 रुपये रोख रक्कम आणि काही बोगस इ-पहचान कार्ड असा ऐवज जप्त करण्यात आला.
इएसआयच्या वेबसाईटवर कंपनीची नोंद करून एका बोगस कार्डसाठी 20 हजार रुपये आकारण्यात येत होते. नोंदवलेल्या बोगस कंपनीत कर्मचारी म्हणून तो कार्डधारक काम करत असल्याचे दाखवण्यात येत होते. त्यांच्याकडून मासिक 500 रुपये आकारण्यात येत होते. त्यापैकी 280 रुपये इएसआयला जमा केले जात होते. उर्वरित 220 रुपये ही टोळी घेत होती. बोगस कार्डधारकांना विविध रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी त्यांनी पाठवले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधींचे नुकसान झाले.