Published on
:
23 Nov 2024, 2:02 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:02 pm
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभांमध्ये विद्यमान आमदारांनाच मतदारांनी कौल दिला आहे. भंडारा विधानसभेवर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर आघाडीवर आहेत. नरेंद्र भोंडेकर विजयाकडे वाटचाल करीत आहेत. तर तुमसर विधानसभेवर महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे राजू कारेमोरे यांनी सलग दुसºयांदा विजय मिळविला. साकोली मतदारसंघात कॉंग्रेसचे नाना पटोले अखेरच्या फेरीत ५२९ मतांनी निवडून आले. त्यांचा निसटता विजय झाला.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर, कॉंग्रेसचे पूजा ठवकर आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे अशी तिरंगी लढतीचे चित्र होते. प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टपाली मतांपासून नरेंद्र भोंडेकर यांनी आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम होती. भोंडेकर यांना मिळणाºया मतांचा पाठलाग करताना दुसºया क्रमांकावरील कॉंग्रेसच्या पूजा ठवकर यांची मोठी दमछाक होत गेली. १८ व्या फेरीअंती नरेंद्र भोंडेकर यांनी २४ हजार मतांची आघाडी घेतली होती. भोंडेकर यांची आघाडी फेरीनिहाय वाढत गेल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कॉंग्रेसच्या पूजा द्वितीय क्रमांकावर होत्या. भंडारा विधानसभेत एकूण ३२ फेºया होत्या. वृत्त लिहीपर्यंत १८ व्या फेरीपर्यंत नरेंद्र भोंडेकर हेच आघाडीवर होते.
तुमसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे राजू कारेमोरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चरण वाघमारे यांच्यात थेट लढत झाली. पहिल्या फेरीपासूनच राजू कारेमोरे यांनी आघाडी घेतली होती. १२ व्या फेरीअखेर राजू कारेमोरे यांनी २९ हजार मतांची आघाडी घेतली होती. तर चरण वाघमारे यांना अवघे ३२ हजार मते मिळाली होती. राजू कारेमोरे यांच्या मतांची आघाडी दर फेरीनिहाय वाढत होती. या आघाडीच्या मतांचा पाठलाग करताना चरण वाघमारे बरेच मागे राहिले. परिणामी, राजू कारेमोरे ६६ हजार ३०३ मतांच्या आघाडीने विजयी झाले. चरण वाघमारे यांना ७० हजार ३०० मते मिळाली. तर राजू कारेमोरे यांना १ लाख ३४ हजार ५०७ मते मिळाली. राजू कारेमोरे यांचा तुमसर मतदारसंघात सलग दुसºयांदा विजय झाला.(Maharashtra assembly polls)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी राहिली. हाय व्होल्टेज असलेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी पिछाडीचा खेळ रंगत गेला. पहिल्या फेरीत आघाडीवर असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही फेºयानंतर पिछाडीवर गेले. भाजपचे अविनाश ब्राम्हणकर हे कधी आघाडी तर कधी पिछाडीवर होते. २८ फेºयांपैकी १४ व्या फेरीअखेर कॉंग्रेसचे नाना पटोले हे अवघ्या ४६९ मतांनी आघाडीवर होते. तर १६ व्या फेरीअखेर भाजपचे अविनाश ब्राम्हणकर ११३ मतांनी आघाडीवर होते. १६ व्या फेरीनंतर मात्र ब्राम्हणकर यांनी आघाडी घेतली. १६ व्या फेरीनंतर ब्राम्हणकर १२३ मतांच्या आघाडीवर होते. २२ व्या फेरीनंतर ब्राम्हणकर २९५५ मतांनी आघाडीवर होते. २४ व्या फेरीत ब्राम्हणकर २२०० मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा कायम होती. अखेरीस २८ व्या शेवटच्या फेरीत नाना पटोले अवघ्या ५२९ मतांनी विजयी झाले. भाजपचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांना कमकुवत उमेदवार म्हणून संबोधले जात होते. परंतु, याच कमकुवत उमेदवाराने नाना पटोलेंना तगडी लढत दिली.