Published on
:
23 Nov 2024, 12:17 pm
Updated on
:
23 Nov 2024, 12:17 pm
पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सपाटून आपटली असली तरी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनोद निकोले यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.
डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये माकपचे उमेदवार विनोद निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांचा पराभव करत दुसऱ्यांदा या विधानसभेवर आमदार निवडून येण्याची किमया साधली आहे. अखेरच्या फेरीत विनोद निकोले यांना 5133 मताधिक्य मिळवून ते विजयी झाले आहेत.
डहाणूमध्ये भाजप विरुद्ध माकप असा जंगी सामना पाहायला मिळाला. महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी डहाणूमध्ये येऊन निकोले यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत नागरिकांना मोठी आश्वासने दिली होती. मात्र विनोद निकोले यांनी केलेली जनविकासाची कामे लक्षात घेता मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे समोर आले आहे. विनोद निकोले यांना 24 व्या फेरीअखेर एक लाख 4702 मते मिळाली. तर भाजपच्य विनोद मेढा यांना 99 हजार 569 मते मिळाली. या मतदारसंघात मतमोजणी दरम्यान सुरुवातीच्या काळात भाजपचे विनोद मेढा हे आघाडीवर होते. त्यानंतर मध्यावधी मतमोजणीनंतर विनोद निकोले यांनी सरशी घेत अखेरपर्यंत मताधिक्य राखले. जनविकासाच्या कामामुळे मतदारांनी मला कौल दिला असून मी मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.