मार्गदर्शन करताना खा. प्रणिती शिंदे.Pudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
18 Nov 2024, 11:35 pm
मंगळवेढा : जनतेच्या अस्तित्वाची व प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली असून ही भगीरथ भालके यांची निवडणूक नाही. तुम्ही त्यांना विजयी करा. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
पंढरपूर येथील शिवतीर्थावर प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर जयश्री भालके, समाधान काळे, गणेश पाटील, युवराज पाटील, तानाजी खरात, सिद्धेश्वर आवताडे, प्रशांत साळे, पांडुरंग चौगुले, मारुती वाकडे, मोहन कोळेकर, भारत बेदरे, बसवराज पाटील, किरण घाडगे, पंढरपूर येथील उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. शिंदे म्हणाल्या की, भारत भालके तीन वेळा विजयी झाले होते. मलाही लोकसभेत या मतदारसंघाने मोठा आशीर्वाद दिला. आता कारण आम्ही तुमचे प्रेम कमवले. नानांच्या आशीर्वादाने भगीरथ यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. ही निवडणूक पैशाचा खेळ करणारी राहिली नाही. हे लोकसभेच्या निकालात दिसून आले. मत विभागणी करण्यासाठी काही मंडळी उभी राहिले आहेत. या निवडणुकीत सगळे सच्चे कार्यकर्ते भगीरथ भालकेंसोबत आहेत. पोटनिवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांची खरेदी झाली. नेते एकीकडे व जनता एकीकडे, अशी ही निवडणूक दिसत आहे. जीएसटी वाढवली, महागाई वाढवली, पैशाने शेतकर्यांच्या इमान व स्वाभिमान परत मिळवता येत नाही, असे सांगितले.
यावेळी उमेदवार भगीरथ भालके यांनी बोलताना गुंडगिरी, दडपशाही मोडीत काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई आहे. स्व. नाना गोरगरिबांच्या अडचणींना धावले. मात्र हे आमदार कधी आले का, याचा विचार करा. कॉरिडोरला आमदार पाठिंबा देतात. कारण त्यांना हजारो कोटी रुपयांची कामे मिळवायची आहेत. शेतकरी, मराठा, धनगर, कोळी यांच्याबाबत दुर्लक्ष करणार्या सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे. जुन्या पेन्शनच्या आंदोलनकर्त्यांनी सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, डॉ. प्रणिता भालके, समाधान फाटे, रणजित बागल, पोपट पडवळे, सुमित शिंदे, सागर यादव, किरण घोडके आदींनी विचार मांडले. सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी केले.