महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या आणि प्रचंड मोठा विजय मिळवला. आता या विजयानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की, काय एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रा होणार? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे. शिंदे यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद आहेच, पण कपाळावर काही चिंता ही आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आघाडीचे कोणतेही निश्चित सूत्र नाही. सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचाच मुख्यमंत्री होईल असं काही नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीतील कल महायुतीच्या बाजूने असल्याचे शिंदे म्हणाले.
भाजप सर्वात मोठा पक्ष
महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण यावेळी मुख्यमंत्री निश्चितपणे भाजपचाच होणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यावरुन आता नितीश कुमार देखील चर्चेत आहेत.
महाराष्ट्रातील ही परिस्थिती २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीसारखी आहे. तेव्हा भाजपला ७४ जागा आणि जेडीयूला ४३ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले होते. आता महाराष्ट्रात भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय?
भाजपला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी राहावेत, अशी शिवसेनेची इच्छा आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, असे काही लोकांचे मत आहे. त्यामुळे युती मजबूत होईल. मात्र देवेंद्र फडणवीस हे जास्त अनुभवी असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. भाजपसाठी हा कठीण निर्णय असणार आहे. कारण युतीत फूट पडणार नाही याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे.