भाजपला राज्यातच नव्हे तर देशातही पक्ष फोडण्याची चटक लागली आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदर संजय राऊत यांनी केली. तसेच ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, मूळ शिवसेना पक्ष फोडला, त्याच प्रमाणे अजित पवारांचा पक्ष, मिंधेंचा पक्ष, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचाही पक्ष फोडला जाईल असेही संजय राऊत म्हणाले.
पुण्यात पत्रकारांशी बोलतना संजय राऊत म्हणाले की, आज पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो आणि विधानसभेत आम्ही हरलो. त्याची कारणं काय आहेत हे संपूर्ण देशाला समजली आहेत. या पराभवाना खचून न जाता महानगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुका या आम्हाला लढवाव्याच लागतील. त्या दृष्टीने तयारीही सुरू आहे. या निवडणुकीत स्वबळाचा नारा जरी दिला असला तरी महाविकास आघाडी फुटली असा अर्थ होत नाही. हा मुंबईपुरता विषय आहे. मुंबईवर शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने सातत्याने मुंबईवर आपली पकड ठेवलेली आहे. ती तशीच ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की आपण स्वबळावर लढलं पाहिजे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षप्रमुखांनी व्यक्त केल्या आहेत. पण ही परिस्थिती इतर जिल्हा आणि शहरात असेल का तर या बाबत साशंकता आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात तिनही पक्षांच्या नेत्यांनी म्हटलं की आपण एकत्र लढलं पाहिजे. त्या त्या कार्यकर्त्यांच्या भुमिका पाहून आपण निर्णय घेऊ. कालचा विचार न करता या निवडणुकांना आम्ही सामोरं जाऊ असे संजय राऊत म्हणाले.
फडणवीस जेव्हा मुख्यमंत्र्यावरून उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला. हायकमांडने त्यांना सूचना दिल्या की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. काही करून सत्तेत रहायचं ही या सगळ्यांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. भाजप हे एकनाथ शिंदे यांचं हायकमांड आहे, त्यांनी शिंदेंना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले. आणि तुम्हाला स्विकारावं लागलं. यामध्ये याचा मान राखला, त्याचा मान राखला हे तर्कसंगत नाही. देवेंद्र फडणवीस त्यांच्या हायकमांडचा मान राखावा लागला, त्याच हायकमांडचा मान एकनाथ शिंदेंना पाळावा लागला. उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरी खटले थांबवण्यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय त्यांना पर्याय नव्हता असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
शिंदे गटात उदय होणार, मला कुणाचीही नावं घ्यायची नाहीत. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस मूळ शिवसेना तोडण्यात आली, त्याच पद्धतीने अजित पवारांचा, एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भाजपला संपूर्ण देशात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. चंद्राबाबू, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या जीभेला रक्त लागले आहे, आणि जो पर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहील अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.