Published on
:
19 Nov 2024, 11:54 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:54 pm
बहुध्रुवीय जगामध्ये आशिया व आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थसत्तांना मौलिक भूमिका पार पाडावी लागणार आहे. भारत दक्षिणेकडील या नव्या आकांक्षी देशांचे समर्थ नेतृत्व करीत आहे. भारत आणि नायजेरिया हे दोन्ही देश बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुआयामी आहेत. अशा या बहुसांस्कृतिक राष्ट्रांमध्ये मैत्री व सहकार्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे.
नायजेरिया हे या देशाचे नाव तेथे वाहणार्या नायजर या मुख्य नदीच्या नावावरून रूढ झाले आहे. ब्रिटिश वसाहतीमध्ये असताना पत्रकार फ्लोरा शॉ यांनी या भूमीला नायजेरिया नाव दिले. नायजेरिया हे प्रजासत्ताक अटलांटिक महासागराच्या उत्तरेला साहेल आणि दक्षिणेला गिनीचे आखात यांच्यामध्ये वसलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच दिवसांच्या नायजेरिया, ब्राझील आणि गयाना दौर्यावर आहेत. त्यापैकी त्यांची दोन दिवसांची नायजेरिया भेट महत्त्वपूर्ण ठरली. नायजेरिया लोकसंख्येच्या द़ृष्टीने आफ्रिकेतील सर्वात मोठा देश आहे. तसेच त्याची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर होती. तेथील चलनाच्या अवमूल्यनामुळे नायजेरिया आता दुसर्या स्थानावर आहे. भूराजनैतिकदृष्टीने त्याचे विशेष स्थान असल्यामुळे या भेटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 17 वर्षांनंतर प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी नायजेरियाला भेट दिली. त्यामुळे आफ्रिका खंडातील देशांशी भक्कम आणि द़ृढतर मैत्री प्रस्थापित करण्याचा भारताचा संकल्प सिद्धीस जात आहे. ही ऐतिहासिक भेट उभय राष्ट्रांतील भागीदारी अधिक भक्कम करणारी ठरली आहे. पंतप्रधान मोदी हे नायजेरियाला भेट देणारे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत. त्या अगोदर पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती. तसेच सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे 1969 मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसरी यांना ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ हा नायजेरियाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला होता. हा सन्मान नरेंद्र मोदी यांना बहाल करण्यात आला आहे. आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये सन्माननीय अशा पुरस्कारामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अलंकृत झाले आहे. आजवर प्राप्त झालेला त्यांचा हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. एक सर्वश्रेष्ठ जागतिक नेता या नात्याने त्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
आफ्रिकेतील एक प्रगती करणारे राष्ट्र म्हणून नायजेरिया जगाच्या नकाशावर उदयास येत आहे. 125 वर्षांपूर्वी तेथे भारतीयांनी पाहिले पाऊल टाकले. आता नायजेरियात सुमारे 60 हजार भारतीय नागरिक राहतात आणि त्यांनी नायजेरियाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे 200 भारतीय उद्योग नायजेरियामध्ये प्रस्थापित झाले आहेत. या उद्योगांनी बहुमूल्य उत्पादनामुळे नायजेरियाच्या आर्थिक विकासात भर टाकली आहे. नायजेरियन फेडरल सरकारनंतर तेथील तरुणांना रोजगार देणारे भारतीय उद्योग दुसर्या क्रमांकावर आहेत. औषधे, रसायने, हॉटेल आणि आतिथ्य उद्योग तसेच आभियांत्रिकी, शिक्षण, पर्यटन, आरोग्य यांसारख्या सेवा उद्योगातही भारतीयांनी नायजेरियाच्या विकासात चांगलाच हातभार लावला आहे व तेथील सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा संपादन केली आहे. नायजेरियात राहणार्या भारतीय समुदायाने मोदी यांचे अबुजा विमानतळावर उत्साही स्वागत केले. नायजेरियात मोठा मराठी समुदाय असून तेथील लाडक्या बहिणींनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी समूह स्वरूपात बहारदार लावणी नृत्य सादर केले. मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल तेथील मराठी भाषिकांनी त्यांचे विशेष आभार मानले. निवासी भारतीयांसमोर मोदी यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केलेल्या मार्गदर्शनात भारताच्या आर्थिक प्रगतीची झेप नोंदविली. भारत दहा वर्षांत जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि लवकरच तो तिसर्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिजिटल भारत, विकसित भारत या कल्पना स्पष्ट करून त्यांनी प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारताने घेतलेली गरुडझेप स्पष्ट केली. आपल्या आत्मविश्वास व महत्त्वाकांक्षेने भारतीय समुदाय नायजेरियाच्या विकासात मोठे योगदान देत आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यामुळे नायजेरियासारख्या देशात राहून त्या देशाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणार्या भारतीयांना हुरूप व उत्साह वाटणे साहजिक आहे. भारत आणि नायजेरियातील धोरणात्मक भागीदारी वाढवून मैत्री नव्या उंचीवर नेण्याच्यादृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. विशेषतः द्विपक्षीय संबंधांत परस्पर विकासाची नवी क्षेत्रे अधिक मजबूतपणे उदयास येत आहेत. उभय देशांतील व्यापार आयात-निर्यात वाढविण्याच्यादृष्टीनेही एक महत्त्वाचे दमदार पाऊल ठरणार आहे. विशेषतः भारताने ‘अॅक्ट ईस्ट’ हे धोरण जसे भक्कमपणे प्रतीत आणले आहे तसेच गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासासाठी ‘लुक अॅन्ड अॅक्ट इन आफ्रिका’ हा नवा सिद्धांत उदयास येत आहे. राष्ट्रपतींची अल्जेरिया भेट आणि पंतप्रधानांची नायजेरिया भेट यातील सुसंगती लक्षात घेण्यासारखी आहे. आफ्रिकेतील सक्षम देशांकडे भारत मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. कारण त्यांना भारताच्या मदतीची गरज आहे आणि भारतालाही आपले सामाजिक, आर्थिक, औद्योगिक हितसंबंध जोपासण्यासाठी ही नवस्वतंत्र राष्ट्रे उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे नायजेरिया दौर्याची फलश्रुती ही उत्पादक ठरली असे पंतप्रधानांनी केलेले विधान अर्थपूर्ण आणि तेवढेच दूरद़ृष्टीचे द्योतक आहे.