मंत्र्याच्या माजी कर्मचार्यास अटक मास्टरमाईंड दीपश्रीचा ‘तुफान’ मित्रPudhari File Photo
Published on
:
19 Nov 2024, 11:52 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:52 pm
फोंडा : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाशी संबंधित आणखी एकाला म्हार्दोळ पोलिसांनी अटक करून नवीन ‘ट्विस्ट’ दिला. सध्या म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात असलेली दीपश्री सावंत गावस हिचा एक मित्र माशेल येथील अनिकेत खांडोळकर ऊर्फ तुफान (वय 27) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे केले असता 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनिकेत खांडोळकर हा एका मंत्र्याच्या कार्यालयातील माजी कर्मचारी आहे. त्याला काही दिवसांपूर्वी ‘त्या’ मंत्र्याने कामावरून कमी केले होते. कदाचित अनिकेतचे कारनामे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई झाली असावी, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
अनेकांना पैशांना ठकवणारी आणि ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मास्टरमाईंड संशयित दीपश्री सावंत गावस ही सध्या म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणातील बहुतांश अटक झालेले हे प्रियोळ मतदारसंघातील आहेत.
विरोधी पक्षांकडून 21 रोजी पणजीत रॅलीचे आयोजन
पणजी : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आवाज उठवण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन सर्व विरोधी राजकीय पक्षांनी केले आहे.
21 नोव्हेंबर रोजी पणजी आझाद मैदानावर मोठ्या जाहीर सभा आणि रॅलीचे आयोजन केले आहे. या संदर्भात पणजीतील एका तारांकित हॉटेलमध्ये सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत 21 रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अमित पाटकर यांनी दिली. सरकारी नोकर्या विकल्या जातात यावर राजकारण्यांनी कबुली जबाब दिला आहे, असे पाटकर म्हणाले. तरुण पिढी भरडली गेली असून रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय उरला नसल्याचे पाटकर म्हणाले.