परभणी मतदान झाल्यानंतर आता विजयाचे आडाखे बांधले जात असून कार्यकर्ते गणिते मांडण्यात व्यस्त आहेत. File photo
Published on
:
21 Nov 2024, 10:05 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:05 am
पूर्णा: गंगाखेड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) पूर्णा शहरासह तालुक्यातील १४९ बुथवर मतदान झाले. ७३.०४ टक्के मतदानाची टक्केवारी नोंद झाली. पूर्णेचे शेतकरी भुमिपुत्र तथा शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम, रासपाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, तर वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांच्यात अटीतटीची लढत झाली.
निवडणूक प्रचार काळात एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. यातच कार्यकर्त्यांचे जथ्थे या पक्षातून त्या पक्षात, तर या मित्रमंडळातून त्या मित्रमंडाळात प्रवेशीत झाले. तसेच पाठिंबा सत्रही गाजले. त्याचबरोबर निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊनही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले. परंतु , निवडणूक आयोगाने नेमून दिलेले भरारी पथके जाणीवपूर्वक याकडे कोणाडोळा करताना दिसून आले. पोलीस प्रशासनाची देखील हीच भूमिका घेतल्याचे दिसून आले.
मतदानानंतर आता कोण निवडून येणार? कोणत्या उमेदवाराला कुठे कसे मतदान झाले? कोण किती मते खाणार? मग अमुक इतक्या मतांची आघाडी घेऊन आपलाच उमेदवार विजयी होणारच? असे विजयाचे आडाखे, गणिते मांडताना कार्यकर्ते मग्न असल्याचे दिसून येत आहे. शेवटी कोण निवडून येणार? हे पाहण्यासाठी शनिवारी (दि.२३) मतमोजणीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.