मतदान संपताच मद्यपींची दुकानाबाहेर अलोट गर्दीPudhari
Published on
:
21 Nov 2024, 3:27 am
Updated on
:
21 Nov 2024, 3:27 am
Shikrapur News: विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी (दि. 20) सायंकाळी सहा वाजता संपताच दारू दुकानांच्या बाहेर मद्यपींनी अलोट गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. परंतु जिल्हाधिकार्यांचा आदेश प्राप्त न झाल्याने परमिट रूम व देशी दारूची दुकाने बंदच राहिली होती. दुकान कधी उघडणार या मागणीने मद्यपींनी दुकान मालकांना हैराण केले होते.
निवडणूक प्रचाराची सांगता सोमवारी (दि. 18) सायंकाळी झाल्यानंतर मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण होईपर्यंत सर्व परमिट रूम व देशी दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले होते. मतदान संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या पुढे ही दुकाने चालू होणार असल्याने मतदान संपताच या दुकानांपुढे मद्यपींनी मोठी गर्दी केली होती.
परतु सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या पदरी निराशा पडली. मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी व प्रशासनाचा आदेश न आल्याने मद्यालय बंद ठेवत असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले. प्रशासनाचा आदेश येईल व दारूची दुकाने उघडली जातील या प्रतीक्षेत मोठ्या संख्येने मद्यपी दुकानाच्या बाहेर थांबून राहिले होते.