राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. त्यातच आता मुंबईत एक मोठी घडामोड घडली आहे.
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. त्यातच आता मतदानापूर्वी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे एकमेकांसमोर आले आहेत.
अमित ठाकरे हे मतदान करण्यापूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी सदा सरवणकर हे देखील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पटांगणात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे एकमेकांसमोर आले. यावेळी त्यांनी दोघांनी हात मिळवत एकमेकांनी शुभेच्छा दिल्या.